Pusegaon Bakri Eid : पुसेगावात मुस्लिम बांधवांनी नाकारली ‘कुर्बानी’; कारण वाचून तुम्हीही कराल सॅल्यूट
Pusegaon Bakri Eid : सेवागिरी महाराजांच्या पवित्र गुरुवारचा मान राखत मुस्लिम बांधवांनी टाळली ईदची कुर्बानी; हिंदू-मुस्लिम सलोख्याचे अनोखे उदाहरण.

Pusegaon Bakri Eid – श्री सेवागिरी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुसेगावनगरीतील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद सण साजरा करताना जातीय सलोख्याचे दर्शन घडवले. पुसेगावमध्ये गुरुवार हा सेवागिरी महाराजांचा पवित्र दिवस मानला जात असल्याने गावात मांस विक्री व सेवनास बंदी आहे. त्यामुळे गुरुवारी बकरी ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी ‘कुर्बानी’ टाळली. त्यांनी दाखवलेल्या समंजसपणाचे कौतुक होत आहे.
श्री क्षेत्र पुसेगाव हे सेवागिरी महाराजांचे पवित्र स्थान असून, येथे त्यांची संजीवन समाधी आहे. या नगरीला मोठे अध्यात्मिक महत्त्व आहे. साधुसंतांनी समाजाला नेहमीच शांतता, संयम आणि सन्मार्गाची दिशा दाखवली आहे. या मार्गावर चालताना हिंदू धर्मात आणि संतांच्या शिकवणीत प्राणिमात्रांवर दया करण्याचे आणि अहिंसेचे महत्त्व सांगितले गेले आहे. त्यातच पुसेगावमध्ये गुरुवार हा सेवागिरी महाराजांचा पवित्र आणि अध्यात्मिक दिवस मानला जातो.
या दिवशी गावात मांस विक्री आणि सेवनास पूर्णपणे बंदी असते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी (दि. 28) झालेल्या बकरी ईददिवशी गावातील मुस्लिम बांधवांनी एकतेचे आणि समंजसपणाचे अनोखे उदाहरण सर्वांसमोर ठेवले. इतर धर्मीयांच्या भावना आणि गावाच्या अध्यात्मिक परंपरेचा आदर राखून, मुस्लिम समाजाने गुरुवारी ‘कुर्बानी’ न देता, अत्यंत शांततेत आणि उत्साहात बकरी ईद साजरी केली. ईदची कुर्बानी आज (दि. 29) देण्यात आली. गावाचे अध्यात्मिक महत्त्व आणि पावित्र्य राखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी घेतलेली सहकार्याची भूमिका कौतुकास्पद ठरली.
“या निर्णयाने पुसेगावातील मुस्लिम बांधवांनी शांतता, बंधुभाव आणि धार्मिक सलोख्याचा सुंदर संदेश दिला आहे. अशाच प्रकारे एकमेकांच्या धर्मांचा आणि भावनांचा सन्मान राखण्याचा हा हा ऐतिहासिक निर्णय, सर्व धर्मीयांची प्रगती आणि गावच्या शांततेसाठी मैलाचा दगड ठरेल, यात तीळमात्र शंका नाही.”
– राम जाधव, पुसेगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष.





