पुणे जिल्हा | पूर्वा वळसे निवडणूक लढविण्यास इच्छूक नाही – दिलीप वळसेपाटील

मंचर, (प्रतिनिधी) – विधानसभा ताकतीने लढवायची व जिंकायची आहे. काही लोक बदनामी करतात, खोटे बोलतात, त्याला मी उत्तर देऊ इच्छित नाही. माझी मुलगी पूर्वा वळसे पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, म्हणून मलाच उभे राहावे लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मुलींच्या तांत्रिक शिक्षणात पूर्वी असणारी ५० टक्क्यांची सवलत आता १०० टक्के झाली आहे. दुधाला पाच रुपये अनुदान देण्यात येत आहे. खेड,आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील हिरडा विकासासाठी १५ कोटी रुपये दिले आहेत.
मागील ३५ वर्षे मला विधिमंडळात पाठवले. त्या माध्यमातून मी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा या पुणे, मुंबईच्या रुग्णालयाच्या तोडीची आहे. नवीन १०० बेडच्या रुग्णालयाचे तांबडेमाळा, अवसरीफाटा येथे काम सुरू आहे. शिक्षणासाठी हायस्कूल, वसतीगृह, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग,आश्रम शाळा सुरू केल्या. अवसरीच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ६ हजार तरुण इंजिनियर तालुक्यात निर्माण झाले.
अजित पवार म्हणाले की, ३४ वर्षात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगावचा कायापालट झाला आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध संस्था उभ्या राहिल्या आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये उर्वरित प्रश्न सोडवले जातील.
कळमोडीचे, म्हाळसाकांत,शिरूर तालुक्यातील बारा गावांसाठी पाणी योजना होईल. आदिवासी भागातील गावांसाठी ही पाणी योजना करण्यात येईल. डिंभेचा बोगदा जुन्नर-आंबेगावच्या हिताचे जे असेल त्यानुसार केला जाईल.
वळसे-पाटलांच्या कार्याची राज्याला माहिती
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कार्य उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अत्यंत संयमी नेतृत्व आपल्या राज्याला मिळाले आहे. बऱ्याचवेळा कॅबिनेटमध्ये मीटिंग चालू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आणि इतर मंत्रिमंडळातील सहकारी विविध विषयावर चर्चा करत असताना त्यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मतही आवर्जून घेतले जाते. ते अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद बोलत असताना त्यांच्या सूचना ऐकण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत सर्वजण आतुर असतात, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.





