पुणे जिल्हा | पूर्वा वळसे पाटील यांनी घेतल्या घोडेगावला नागरिकांच्या भेटी

मंचर, (प्रतिनिधी) – घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील आठवडे बाजारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव विधानसभेचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांचा प्रचार करण्यात आला. वळसे पाटील यांच्या कन्या युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील यांनी बाजारात शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांच्या भेटी घेतल्या.
यावेळी बाजारातील व्यापारी व शेतकरी यांना वळसे पाटील यांच्या कामांची माहिती पूर्वा वळसे पाटील यांना करून दिली. येथील व्यापारी संघटनेने वळसे पाटील यांच्या मागे उभे राहणार असल्याचे सांगितले.
प्रचार फेरीत माजी सभापती कैलासबुवा काळे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, सोमनाथ काळे, सरपंच अश्विनी तिटकारे, रूपाली झोडगे, क्रांती गाढवे, ज्योती घोडेकर यासह युवक युवतींनी सहभाग घेतला.यावेळी बोलताना पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या, घोडेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे.
येथील जुन्या पिढीने कायम वळसे पाटील यांना साथ दिली आहे. घोडेगावात झालेल्या सरकारी इमारती, रस्ते, पाणी, लाईट यासाठी वळसे पाटील यांनी कोट्यावधींचा विकास निधी दिला आहे. यावेळी विक्रमी मतांची आघाडी द्या कारण वळसे पाटील हेच तालुक्याचे वैभव असून विकास पुरुष म्हणजे आदरणीय वळसे पाटील असे समीकरण आंबेगावकरांनी अनुभवले आहे.
भाजीपाला व्यापारी संतोष सहाणे म्हणाले, लहान मोठ्या व्यापाऱ्यांना वळसे पाटील यांचा मोठा आधार आहे. येथील बाजारपेठ आता वेगाने वाढत आहे. सर्व प्रकारच्या सुख सुविधा वळसे पाटील यांच्यामुळे उभ्या राहिल्या आहेत.





