Purushottam Karandak: पुरुषोत्तम करंडकाची तिसरी घंटा वाजणार! ६१ व्या वर्षात ‘या’ १३ नवख्या संघांना मिळाली संधी; पाहा संपूर्ण यादी
Purushottam Karandak: महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ६१ व्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी प्रतीक्षा यादीतून १३ संघांची चिठ्ठी काढून निवड.

Purushottam Karandak – महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित सन्मानाची पुरुषोत्तम करंडक नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा लवकरच वाजणार आहे. या स्पर्धेसाठी गतवर्षी झालेल्या स्पर्धेत गुण कमी मिळालेले तळातील संघ आणि नव्याने आलेल्या संघांमधून १३ संघांची निवड बुधवारी (दि. १५) चिठ्ठी काढून करण्यात आली. स्पर्धेचे यंदाचे ६१ वे वर्ष आहे.
एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटी लोणी काळभोर आणि इंदिरा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे दोन संघ स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत आहेत. प्राथमिक फेरीचे अर्ज तीन आणि चार आॅगस्टला सायंकाळी सहा ते आठ या वेळात शनिवारपेठ येथील नातूवाडा येथे स्वीकारण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेतील कमी रँकींग मिळालेल्या १० संघांना वगळून ४१ संघांना थेट स्पर्धेत सहभागी होता येते.
पण, ३८ संघांनीच मुदतीत प्रवेश अर्ज घेतले. प्रतीक्षा यादीत २८ संघ होते. त्यातून बुधवारी १३ संघांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. स्पर्धेचे लॉटस् दि. ७ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात काढण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ ते ३० ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे.
स्पर्धेसाठी निवडलेले संघ :
झील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च, आबासाहेब गरवारे महाविद्यालय स्वायत्त, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, सिंहगड विधी महाविद्यालय, एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटी (नवीन), टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च,
सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट पुणे, डॉ.डी वाय पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पिंपरी, संगमनेर नगरपालिका आर्ट्स डीजे मालपाणी कॉमर्स अँड बी एन सारडा सायन्स कॉलेज, इंदिरा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (नवीन).




