पुणे | पुरुषोत्तमचे अर्जवाटप १४ जुलैपासून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुरुषोत्तम करंडक ही महाराष्ट्रातील अतिशय मानाची स्पर्धा समजली जाते. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे अर्जवाटप दि. १४ आणि १५ जुलै रोजी होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून, स्पर्धेचे ५९ वे वर्ष आहे.
अर्जवाटप सायंकाळी ६ ते ८ या वेळात १२२१ अ, विवेक अपार्टमेंट, सुभाषनगर, शुक्रवार पेठ येथे, तर अर्जांची स्वीकृती दि. ३ आणि ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात ४१८, नातूवाडा, शनिवार पेठ येथे होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी निवेदनाद्वारे कळवली आहे.
महाराष्ट्रीय कलोपासकचे माजी चिटणीस कै. राजाभाऊ नातू यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दि. २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता भरत नाट्यमंदिर येथे दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘तो राजहंस एक’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
प्राजक्त देशमुख, अनिता दाते, अमेय बर्वे, धनंजय गोसावी, हेमंत महाजन यांच्या भूमिका असून, प्रफुल्ल दीक्षित, प्रणव सपकाळे, रोहित सरोदे, चेतन बर्वे, लक्ष्मण कोकणे तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. प्रयोग सर्वांसाठी खुला असून, प्रवेशिका आवश्यक आहे.




