Purandar News: ऐन हंगामात युरियाचा तुटवडा! पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

प्रभात वृत्तसेवा
वाल्हे – यावर्षी पुरंदर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक गावांतील बंधारे, ओढे-नाले भरून वाहिले. परिणामी जमिनीतील पाणीपातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, ऐन रब्बी हंगामात युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
वाल्हे, मांडकी, जेऊर व परिसरात यावर्षी रब्बी पेरणी क्षेत्र वाढले आहे. रब्बी पिकांची खुरपणीही बहुतांश ठिकाणी पूर्ण झाली असून, याच टप्प्यावर पिकांना युरिया खताची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, मागील काही दिवसांपासून परिसरातील खत विक्री दुकानांमध्ये युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना गावोगाव फिरावे लागत आहे.
गहू, ज्वारी, मका, ऊस, तुर, वटाणा, हरभरा, पावटा, घेवडा तसेच भाजीपाला पिकांच्या वाढीसाठी युरिया खत अत्यावश्यक आहे. वेळेत खत न मिळाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाकडून खते उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात दुकानांमध्ये साठा नसल्याचे चित्र दिसत असल्याचे वाल्हे व मांडकी परिसरातील शेतकरी सांगत आहेत.
जेऊर, मांडकी, पिसुर्टी, वाल्हे, हरणी, दौंडज आदी गावांमध्ये उसाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. तरकारी व भाजीपाला पिकांसाठीही युरियाची मोठी मागणी असून, उपलब्धतेअभावी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने लक्ष घालून खतांची टंचाई दूर करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
“शनिवारी रब्बी हंगामातील पिकांसाठी १९० मेट्रिक टन युरिया जेजुरी व सासवड परिसरात दाखल झाला आहे. तसेच पुढील दोन दिवसांत आणखी युरिया उपलब्ध होणार आहे. ज्या भागात युरियाची टंचाई आहे, तेथे तातडीने खत विक्रेत्यांकडे पुरवठा करण्यात येईल. पुढील काळात कमतरता भासू नये, यासाठी युरियाचा साठा ठेवण्यात येणार आहे.”
– श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी





