Purandar News – पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ वरील पुरंदर मधील तक्रारवाडी फाट्यानजीक बेलसर गावचे हद्दीत टोलप्लाझा निर्माण करण्यात आला असून येत्या दोन-तीन दिवसांत या टोलप्लाझावरून वाहन चालकांकडून “टोलवसुली करण्यास सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून एक कंपनीला टोलवसुलीचा ठेका देण्यात आला आहे. टोलवसुली सुरू होणार असली तरी स्थानिकांना टोलमाफी बाबत स्थानिक गावातील,शेतकरी, लोकप्रतिनिधींबरोबर बैठक न घेता किंवा त्यांना विश्वासात न घेता टोलप्लाझा सुरू करण्यात येत असल्याने जेजुरी शहर व परिसरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. जेजुरी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप, दादा फांऊंडेशन, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष यशवंत दोडके, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश लेंडे, मनसेचे तालुकाध्यक्ष उमेश जगताप, शहराध्यक्ष गणेश कुंभार,गणेश जगताप, शिवराज झगडे, हेमंत माने, सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत आदींसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने टोलनाक्यावर दाखल होत टोलप्लाझा कंपनीच्या व्यवस्थापकाला निवेदन दिले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. पुरंदर तालुक्यातील सुमारे २०किलोमीटर अंतरावरील स्थानिक भूमिपुत्रांना पूर्णतः टोलमाफी मिळावी. सासवड हे तालुक्याचे आणि मुख्य व्यापारपेठेचे गाव आहे, सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालये, रुग्णालय, न्यायालय, बाजार समिती आदी सासवड या ठिकाणी असल्याने पूर्व पुरंदरमधील नागरिकांना तालुक्याचे गावी नेहमीच जावे यावे लागते, शेतकऱ्यांना शेतमाल तालुक्याच्या ठिकाणी न्यावा लागतो. बेलसर (ता. पुरंदर) : बेलसर टोलप्लाझा येथे व्यवस्थापकांना निवेदन देताना आंदोलक. या मार्गशिवाय पर्याय नाही, बहुतांश स्थानिक भूमीपुत्रांनी आपल्या जमिनी व्यवसायाच्या जागा राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासाठी दिल्या आहेत. योगदान देणाऱ्या पुरंदरवासीयांवर टोलधाड कशासाठी ?असा सवाल उपस्थित करत टोलमाफी न दिल्यास मनसे,संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काॅंग्रेस, दादा फाऊंडेशन, तसेच विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने टोलनाक्यावर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. स्थानिकांनी टोल देऊ नये – जगताप येत्या दोन दिवसांत टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याचे समजते,आमचा विकासकामांना विरोध नाही. मात्र, स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी, व्यवसायाच्या जागा देऊनही टोल कशासाठी भरावा ? या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप यांनी याबाबत लक्ष द्यावे व न्याय भूमिका घ्यावी, टोल वसुली सुरू करण्यात आली तरी स्थानिकांनी टोल भरू नये असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे संदीप जगताप यांनी केले आहे.