Purandar News: शेतकरी दुहेरी संकटात! वाल्हे परिसरात हुमणी अळीचा प्रादुर्भाव; आडसाली ऊस पिके धोक्यात
Purandar News: बदलत्या हवामानामुळे वाल्हे परिसरातील ऊस, मका आणि भुईमूग पिकांवर हुमणी अळीचा हल्ला; मुळे खाल्ल्याने १५ ते २० दिवसांत पिके वाळत आहेत.

Purandar News – मागील महिन्यांपासून बदलत्या वातावरणामुळे पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील ऊस पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. हुमणी भुंगेरांनी घातलेल्या अंड्यांमधून आता अळ्या बाहेर येत आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यांत केलेली ऊस लागवड, आडसाली ऊस लागवडीवर याचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. अळी पिकांच्या मुळांना खात असल्याने पिके वाळू लागली असून शेतकऱ्यांना पुन्हा लागवड करावी लागणार आहे.
त्यामुळे शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. हुमणी अळी ऊस, मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांच्या मुळांना खाते. त्यामुळे पिकांचे पाणी आणि अन्न शोषण थांबते. परिणामी, पाने पिवळी पडतात. १५ ते २० दिवसांत पीक पूर्णपणे वाळून जात आहेत. वाल्हे परिसरात हुमणीचा प्रादुर्भाव मागील काही वर्षांपासून वाढत असून, पिकांचे ३० ते ८० टक्के नुकसान होत आहे.
दुबार लागणीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत, मजुरी, पाण्याचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. ज्यामुळे त्यांचे आर्थिक संकट वाढते.अशी माहिती ऊस उत्पादन शेतकरी सुशांत भुजबळ यांनी दिली. पावसाची अनियमितता, वाढती उष्णता यांचा हा परिणाम होत असून, अशा स्थितीत जोरदार पावसाची प्रतीक्षा करणे हा एकच उपाय शेतकऱ्यांच्या हाती राहिला आहे. जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले तरच हुमणीचा प्रादुर्भाव कमी होणार आहे.
पांढऱ्या मुळ्या हुमणीचे खाद्य
आता ऊस लागण केल्यानंतर उसाच्या पांढऱ्या मुळ्या हुमणीचे खाद्य बनले आहे. मुळाशीच हुमणी लागत असल्याने वरून केलेल्या फवारणीचा उपयोग होत नाही. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळवणीचा खर्च मोठा असल्याने अनेक शेतकरीवर्ग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे उभी पिके वाळून जात आहेत.





