Purandar airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प निर्णायक टप्प्यात ; प्रांत वर्षा लांडगे यांच्या नेतृत्वात भूसंपादन सुरळीत

प्रभात वृत्तसेवा
सासवड – पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेले भूसंपादनाचे काम आता निर्णायक टप्प्यात दाखल झाले आहे. खानवडी, एखतपूर, मुंजवडी,कुंभारवळण, पारगाव, उदाचीवाडी, वनपुरी गावांमध्ये प्रशासनाकडून जमिनीची मोजणी सुरू आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर संमतीपत्रे मिळाल्याने या प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळत आहे. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वर्षा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली खानवडी, एखतपूर, मुंजवडीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे.
काही वर्षांपासून विमानतळ प्रकल्पावर सातत्याने चर्चा, आंदोलने आणि शेतकऱ्यांचा विरोध व्यक्त होत होता. जमिनी जाणार या भीतीमुळे शेतकरी सुरुवातीला प्रशासनाच्या हालचालींना आक्रमक पद्धतीने विरोध करीत होते. मात्र, वर्षा लांडगे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांनी गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या, त्यांच्या शंकांना संयमाने उत्तरे दिली. शासनाच्या वतीने मिळणाऱ्या मोबदल्याबाबत तसेच पुनर्वसन व सुविधांबाबत विश्वासार्ह माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध कमी होत गेला. आता मोठ्या प्रमाणावर संमतीपत्रे मिळत आहेत.
उपविभागीय अधिकारी लांडगे यांनी प्रक्रियेत केवळ प्रशासनिक अधिकारी म्हणूनच नव्हे, तर गावकरी आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणारी व्यक्ती म्हणून काम केले. शेतकऱ्यांना “शासन शेतकऱ्यांच्या विरुद्ध नाही” हा संदेश त्यांनी सातत्याने दिला. एकीकडे शासनाच्या धोरणांचा आधार घेतला, तर दुसरीकडे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या चिंता, शंका, परंपरा आणि अपेक्षा यांना योग्य न्याय मिळवून दिला. समतोल भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यात त्यांना मोठे यश आले आहे.
सध्या खानवडी, एखतपुर मुंजवडी वनपुरी उदाचीवाडी आणि कुंभारवळण या गावांमध्ये अधिकृत मोजणीचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून मोजणीसाठी आवश्यक यंत्रणा, अधिकारी, तंत्रज्ञ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने कामाला लागले आहेत. शेतकऱ्यांनी स्वखुशीने मोजणीसाठी परवानगी दिल्यामुळे काम सुरळीत चालले आहे. मोजणी प्रक्रियेमध्ये कृषी सहाय्यक ६ मोजणी अधिकारी ६ तलाठी ४० जलसंपदा विभागाचे प्रत्येकी ३ पुरंदर उपसा ३ वन विभागाचे २ कर्मचारी मंडलाधिकारी ८ आहेत. यात ५ टीम केल्या असून प्रत्येक टीममध्ये सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लांडगे यांनी हा संघर्ष टाळून संवादातून मार्ग काढला.
“मोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त किंवा पोलीस बळाचा वापर केला जात नाही शेतकरी स्वेच्छेने आपले क्षेत्र मोजून देत आहेत त्यामुळे पोलीसांचा वाफर करण्यात येत नाही.”
– वर्षा लांडगे, उपविभागीय अधिकारी, पुरंदर.





