Purandar Accident – पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर दौंडज खिंड ते कामठवाडी (ता. पुरंदर) येथील पालखी महामार्गावर एकाच दिवशी तीन वेगवेगळे अपघात होऊन, काही प्रवाशी जखमी झाल्याची घटना मंगळवार (दि.१२) रोजी घडली. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास जात आहे. पालखी महामार्गावरील वाहनाचा वेग जास्त प्रमाणात असल्याने मंगळवारी तीनही ठिकाणी वेगवेगळे अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पालखी महामार्गावरील जुनी जेजुरी येथील उड्डाणपुल चढल्यानंतर वाहनचालक वाहनाचा वेग प्रचंड वाढवत असल्याचे दिसून येते. दौंडज खिंड येथील शिंदेवस्ती येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वेगात जाणाऱ्या पिकअप चारचाकी वाहनाच्या चालकाचा वाहनांवरील ताबा सुटल्याने, पिकअप जीप पालखी महामार्गाशेजारील दुकानाजवळ उलटली. सुदैवाने दुकान बंद असल्यामुळे मोठा अपघात टळला. या अपघातात चालक जखमी झाला असून, पिकअप गाडीची मोठे नुकसान झाले आहे. दुसरा अपघात मंगळवारी सकाळी पाव्हणे सहा दरम्यान, कामठवाडी येथील उड्डाणपुलानजीक घडला. पिकअप वाहन चालकाला डुलकी लागल्याने पिकअप जीप उड्डाणपुलाच्या कठड्याला जोरात धडकली. पालखी महामार्ग (संग्रहित छायाचित्र) यादरम्यान, उड्डाणपुलावरील विद्युत दिव्याच्या खांबांची विद्युत केबलचे नुकसान झाले असून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या महिला या अपघातात थोडक्यात बचावल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शांताराम दुर्गाडे यांनी दिली. तिसरा अपघात मंगळवारी दुपारी कामठवाडी येथील उड्डाणपुलासमोरील हॉटेल राजकमल समोर घडला. या अपघातात ॲपेरिक्षा चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी पलटली.या अपघातात चालकासह महिलेला दुखापत झाली आहे.मंगळवारी दुपारपर्यंत दौंडज खिंड ते कामठवाडी येथील पालखी महामार्गावर तीन अपघात झाले होते.वाहन चालकांनी वाहनाचा वेग कमी ठेवणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. गतिरोधक बसवा; अन्यथा आंदोलन पालखी महामार्गावरील उड्डाणपुलाची कामे जवळपास पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, काही ठिकाणी उड्डाणपुलाजवळील सेवा रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहेत. कामठवाडी येथील उड्डाणपुलाशेजारील सेवा रस्त्यावर गतिरोधक तयार केले नसल्याने अपघात घडत असून पुढील आठवड्यापर्यंत गतिरोधक तयार केले नाहीत तर कामठवाडी येथील ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शांताराम दुर्गाडे यांनी दिली.