Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना मोठा धक्का ! ‘या’ दोन आमदारांचा तडकाफडकी राजीनामा
पंजाब विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच सत्ताधारी आम आदमी पक्षात (आप) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या रणनीतीला अवघ्या २४ तासांत मोठा हादरा बसला आहे.

Arvind Kejriwal : पंजाब विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच सत्ताधारी आम आदमी पक्षात (आप) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या रणनीतीला अवघ्या २४ तासांत मोठा हादरा बसला आहे.
आगामी निवडणुकीसाठी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या ४० उमेदवारांच्या यादीनंतर पक्षात उफाळलेला असंतोष चव्हाट्यावर आला असून दोन विद्यमान आमदारांनी थेट पक्षाचा हात सोडला आहे.
पाटियाला जिल्ह्यातील सानौर मतदारसंघाचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा आणि माजी मंत्री तथा विद्यमान आमदार चेतन सिंग जौरामाजरा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पहिल्या यादीत पत्ता कट झाल्याचे स्पष्ट होताच या दोन्ही नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ (Arvind Kejriwal) उडाली आहे.
पडद्यामागील वादाला अखेर तोंड फुटले
आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तीव्र मतभेद सुरू होते. मतदारसंघातील विकासकामांवरून पक्षातील स्थानिक नेत्यांसोबत त्यांची खडाजंगी सुरू होती. त्यातच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अकाली दलाचे मातब्बर नेते आणि माजी मंत्री सुरजीत सिंह रखडा यांना ‘आप’मध्ये प्रवेश दिल्याने पठाणमाजरा कमालीचे नाराज झाले होते.
रखडा यांच्या प्रवेशामुळे आपले तिकीट कापले जाणार असल्याची कुणकुण त्यांना आधीपासूनच होती. अखेर ४० उमेदवारांच्या यादीत आपले नाव वगळल्याचे पाहताच त्यांनी पक्ष सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’पुढील आव्हाने
पंजाब विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत मानली जात आहे; तर दुसरीकडे भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातही युतीसंदर्भात चर्चांच्या फेऱ्या वेगाने सुरू आहेत. अशा रणधुमाळीच्या तोंडावर विद्यमान आमदारांनी दिलेला राजीनामा म्हणजे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि भगवंत मान यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.






