#Punjab Election 2022:…अन्यथा 2023 मधील निवडणूक अखेरची ठरेल – दिग्विजय सिंह

भोपाळ – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राज्यातील कॉंग्रेसजनांना ऐक्याचे आवाहन करतानाच जोरदार इशाराही दिला. एकोप्याने राहिले नाही तर कॉंग्रेसजनांसाठी 2023 मधील मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक अखेरची ठरेल, असे त्यांनी म्हटले.
दिग्विजय यांनी एका ठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी कार्यकर्ते वेगवेगळे गट करून उभे असल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. मध्यप्रदेशातील निवडणुकीला एकीने आणि प्रामाणिकपणे सामोरे जावे लागेल. अन्यथा, घरी बसण्याची तयारी करा.
आपल्यात ऐक्य नसेल तर कॉंग्रेस कमबॅक करू शकणार नाही. पक्षासाठी कार्यकर्ते मिळणेही अवघड बनेल, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसजनांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले.
दिग्विजय यांनी दिलेल्या इशाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाला. या व्हिडीओचा आधार घेऊन सत्तारूढ भाजपने कॉंग्रेसची खिल्ली उडवली आहे.




