Punjab Election 2027 : भाजप-अकाली दल पुन्हा एकत्र; PM मोदींची पहिली प्रतिक्रिय, म्हणाले – ‘पंजाबचे कल्याण….’
Punjab Election 2027 : पंजाब विधानसभा निवडणूक २०२७ साठी भाजप आणि अकाली दल पुन्हा एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युतीचे स्वागत केले. मुख्यमंत्रीपद अकाली दलाकडे राहण्याचे संकेत.

Punjab Election 2027 : पंजाबच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल यांनी पुन्हा एकत्र येण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
‘पंजाब आणि पंजाबमधील जनतेचे कल्याण सर्वात महत्त्वाचे आहे. अकाली दल पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाल्याचा आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया मोदी यांनी समाजमाध्यमावर दिली. भाजप आणि अकाली दलाची युती काळाच्या कसोटीवर टिकलेली असून पंजाबच्या विकासाला गती देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांनी दिल्लीत युतीची घोषणा केली. पंजाब विधानसभेच्या एकूण ११७ जागांवर दोन्ही पक्ष मिळून निवडणूक लढवतील. अकाली दल मोठ्या भावाच्या भूमिकेत राहील आणि सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्रीपदही त्यांच्याकडे असेल, असे शहा यांनी स्पष्ट केले. मात्र, जागावाटपाचा अंतिम तपशील जाहीर झालेला नाही.
शेतकरी आंदोलन आणि तीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून अकाली दलाने सप्टेंबर २०२० मध्ये भाजपशी २४ वर्षांची युती तोडली होती. आता सहा वर्षांनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. पंजाबमधील अमली पदार्थांचे संकट दूर करणे, शेतकऱ्यांचे कल्याण आणि हिंदू-शीख ऐक्य वाढवणे ही युतीची प्रमुख उद्दिष्टे असतील.
पंजाब विधानसभा : पक्षनिहाय आमदारसंख्या –
पंजाब विधानसभेत एकूण ११७ जागा आहेत. सध्या आम आदमी पक्षाचे (AAP) सरकार असून भगवंत मान मुख्यमंत्री आहेत. मार्च २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत आपला ९२ जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी ५९ आमदारांची गरज असते.
पक्षनिहाय स्थिती :
– आम आदमी पक्ष : ९१
– काँग्रेस : १६
– शिरोमणी अकाली दल : ३
– भाजप : २
– बहुजन समाज पक्ष : १
– अपक्ष : १
– रिक्त जागा : ३





