खलिस्तान समर्थक खासदार अमृतपाल सिंह पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार? ‘या’ पक्षाने केली घोषणा

Amritpal Singh | पंजाबमधील खडूर साहिब मतदारसंघाचे खासदार अमृतपाल सिंह सध्या आसाममधील तुरुंगात आहेत. मात्र, तुरुंगात असतानाच त्यांच्या नावाची थेट पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
पंजाबमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. अकाली दलाने (वारिस पंजाब दे) त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
2023 मध्ये पंजाब पोलिसांनी अमृतसरच्या बाहेरील पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याच्या आरोपावरून अमृतपाल सिंह यांना अटक केली होती आणि आसाममधील दिब्रुगड येथील स्थानिक न्यायालयातून ‘ट्रान्झिट रिमांड’ मिळवली होती.
रिपोर्टनुसार, अकाली दलाने (वारिस पंजाब दे) अमृतपाल सिंह यांना पुढील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. तलवंडी साबो येथे आयोजित बैसाखी परिषदेत ही घोषणा करण्यात आली. फरीदकोटचे खासदार सरबजीत सिंह खालसा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढील दीड वर्ष अमृतपाल सिंह यांचा प्रचार करण्याचे आवाहन केले आहे.
2022 मध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवून काँग्रेसचा मोठा पराभव केला होता. आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकून काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढले होते. त्यावेळी काँग्रेसने 18 जागा जिंकल्या होत्या. तर, शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. शिरोमणी अकाली दलाला 3 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला केवळ 1 जागा मिळाली होती.
दरम्यान, अमृतपाल सिंहचा जवळचा सहकारी पपलप्रीत सिंह याला शुक्रवारी अजनाला येथील न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पंजाब पोलीस 9 एप्रिल रोजी पपलप्रीतला ताब्यात घेण्यासाठी आसाममधील दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात पोहोचले होते. एनएसए अंतर्गत त्याची एक वर्षाची कोठडी संपल्यानंतर बुधवारी त्याला अटक करण्यात आली होती.





