पाटणा : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी सोमवारी विधान परिषदेत बोलताना त्यांचे पती आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा जोरदार बचाव केला. कुठलेही गैरकृत्य केले नसतानाही लालूंना शिक्षा झाली, असे त्या म्हणाल्या. बिहारमधील चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांत लालूंना तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याचा संदर्भ सत्तारूढ जेडीयूचे आमदार नीरज कुमार यांनी विधान परिषदेत बोलताना दिला. त्यावरून सध्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणाऱ्या राबडी यांनी पलटवार केला. जेडीयूचे नेते बहुधा ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाच्या भीतीच्या छायेखाली वावरताना दिसतात. आमच्याकडे पहा. त्या यंत्रणा आम्हाला दिवसागणिक नोटिसा पाठवतात. तरीही कुठल्या भीतीविना आम्ही बिहारमध्ये कार्य करत आहोत. बिहारमधील राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीची खिल्ली उडवण्याची जणू सवयच आताच्या सत्ताधाऱ्यांना लागली आहे. त्या कालावधीविषयी बोलताना ते वास्तव का लपवतात? केंद्रातील तत्कालीन वाजपेयी सरकार बिहारला निधी देताना हात आखडता घ्यायचे. तसे असूनही आम्ही रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गरीब मुलांना शालेय शिक्षण उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहिलो, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली.