Pune : पुणेकरांची ‘कोंडीतून’ सुटका होणार; विधानसभेत मोठी घोषणा, सरकाराचा नवा प्लॅन काय?

पुणेः शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. नुकताच काही महिन्यापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. या अहवालात जगात वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणे शहराचा चौथा, तर देशात तिसरा क्रमांक लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.
यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थेच आहे. विधानसभेत सुरू असलेल्या अधिवेशनात पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी दिली.
त्यानुसार शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी एआयवर आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले.
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतकू विभाग आणि पोलीस यंत्रणेचा समन्वय वाढविला जाईल. शहरातील स्पीड ब्रेकर, अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर उपाययोजना व अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल सिस्टिम आणि अन्य सुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येणार आहे.
ड्रँक अॅन्ड ड्राईव्ह संदर्भातील कायद्यात सुधारणा
या संदर्भात आमदार चेतन तुपे यांनी लक्ष्यवेधी सूचना मांडल्या होत्या. ड्रँक अॅन्ड ड्राईव्ह संदर्भातील कायदा अधिक कडक करण्यात येणार असून त्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. तसेच गुन्ह्यातील आरोपींची सुटका होऊ नये, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.





