Ajit Pawar : “चंद्रकांतदादांना पुणेकर अजून कोल्हापूरचेच समजतात”; पुण्यात अजितदादांची तुफान टोलेबाजी! उपस्थितांमध्ये पिकला हशा, काय घडलं?

Ajit Pawar : काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत तुफान फटकेबाजी केली. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या घरात ‘दादा’म्हटलं जायचं…या ‘दादा’नं देश गाजवला. आज आपल्या व्यासपीठावरही दोन दादा आहेत, एक अजितदादा (पवार) आणि दुसरे रोहितदादा (टिळक) असा उल्लेख निवेदिकेने केला. पण स्टेजवर असलेल्या दुसऱ्या दादांचा विसर निवेदिकेला पडला अन् पुढं यावरूनच अजित दादांनी त्यांच्या स्टाइलमध्ये तुफान फटकेबाजी केली.
अजित पवार यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर निवेदिकेचा हाच धागा पकडत निवेदिका पुण्याच्याच आहेत का हो ? असा मिश्किल सवाल केला. त्यांच्या या सवालावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार पुढं म्हणाले म्हणजे मुख्यमंत्री महोदय, चंद्रकांतदादांना आमचे पुणेकर अजून कोल्हापूरचेच समजतात. ही काय अडचण आहे? तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथेच लक्ष घालत नाही, असा टोला अजितदादांनी लगावला. त्यांच्या मिश्किल टोल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील खास शैलीत उत्तर दिलं.
त्यावर तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊ दिले नाही, असं मिश्किल विधान त्यांनी केलं. त्यावर पुन्हा अजित पवार यांनी तुमच्याबरोबर यायचं ठरलं, तेव्हा पुण्याचा पालकमंत्री करतो हे कबूल केलंत म्हणून तुमच्यासोबत आलो असल्याचे स्पष्ट केलं. यानंतर पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.
शिंदेंनाही लगावला मिश्किल टोला
नितीन गडकरींनी देशात सर्वदूर चांगले रस्ते केले आहेत. सुरत, गुवाहाचे रस्तेही त्यांनीच केले होते, असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावर त्यामुळेच तुमची सोय झाली. लवकरच पोहोचलात. तुमच्यामागे आम्ही पोलिस पाठवले, पण त्यांनाही तुम्हाला गाठता आले नाही, असा मिश्किल टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना लगावला.





