पुणे | शेअर ट्रेडिंगच्या नादात पुणेकर दरराेज गमवतात ५० लाख रुपये

पुणे, {विजयकुमार कुलकर्णी} – चार महिन्यांत ४५९ प्रकरणात तब्बल ६४ काेटी रुपयांची फसवणूक – सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे कोणी सांगत असेल तर सावधान. तुमची फसवणूक होऊ शकते.
कारण सायबर चाेरटयांचा शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून नागरिकांचे काेट्यवधी रुपये हडप करण्याचा गाेरखधंदा सुरू आहे. शहरात नागरिकांची दररोज सुमारे ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार महिन्यांत केवळ पुणे शहरातच ४५९ प्रकरणांत नागरिकांना ६४ काेटी ४५ लाख ३४ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
व्हाॅटसअप, इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्रॉमसह विविध साेशल मीडियाच्या माध्यमातून सायबर चाेरटे हे शेअर ट्रेडिंग, ब्लाॅक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची जाहीरात करतात. ट्रेडिंगचे प्रशिक्षण देखील दिले जाईल, असे सांगून एक लिंक संबंधितास पाठवून व्हाॅटसअप ग्रुप जाॅइन करण्यास सांगितले जाते.
संबंधित कंपनी चांगल्याप्रकारे नफा मिळवत असल्याचे सांगून इतरांना कशा प्रकारे नफा मिळत आहे, हेही बनावटरित्या दाखवून देत दुप्पट, तिप्पट, चारपट परताव्याचे अमिष दाखवले जाते. सुरुवातीला काही प्रमाणात परतावा देऊन अधिक रक्कम गुंतवणूक करण्यास सांगण्यात येते. त्यानुसार माेठया प्रमाणात गुंतवणूक केल्यावर मात्र, ही रक्कम सायबर गुन्हेगार परत न करता वेगवेगळी कारणे सांगून गुंतवणुकदारास ताटकळत ठेवतात.
याउलट गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्यासाठी आणखी रक्कम भरण्यास भाग पाडून माेठया प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली जात आहे, त्यानंतर मात्र गुंतवणुकदार पाेलिसांकडे धाव घेत आहेत. डाॅक्टर, चार्टड अकाऊंटंट, आयटी इंजिनिअर, नाेकरदार, व्यवसायिक, रिटायर्ड व्यक्ती आणि गृहिणींची संख्या फसवणूक होणाऱ्यांमध्ये लक्षणीय आहे.
काय काळजी घ्यावी…
शेअर बाजारात गंतवणूक करताना मान्यताप्राप्त शेअर ब्राेकिंग कंपनीच्या माध्यमातून व्यवहार करावे. डीमॅट खाते, ब्राेकर आयडी, बँक खाते याची खातरजमा करुन व्यवहार करावा. संबंधित कंपनी नाेंदणीकृत आहे का, त्याचा नाेंदणी क्रमांक काय आहे. शेअर ब्राेकर ग्राहक आयडी काय आहे ? या बाबी तपासून पाहव्यात, असे फौजदारी वकील अॅड. अभिषेक हरगणे यांनी सांगितले.
सरकारमान्य बॅंक, म्युच्यूअल फंड येथे गुंतवणूक केल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. मात्र, अधिकाधिक नफ्याच्या मोहाने इतर ठिकाणी गुंतवणूक केली जाते. आपल्याला आमिष दाखवलेली ज्यादा रक्कम मिळणे शक्य आहे का, याचा विचार गुंतवणूकदारांनी केला पाहिजे. जर शक्य असते, तर सरकारनेच तेवढा परतावा दिला असता. केवळ अधिक नफा मिळण्याच्या मोहामुळे जोखीम पत्करू नये. – अॅड. पुष्कर दुर्गे, प्रसिध्द फौजदारी वकील




