पुणे : जुलैचे जवळ जवळ वीस दिवस बाकी असताना पुणेकरांच्या वर्षाच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मे पासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने खडकवासला धरणासाखळीतील पाणीसाठा २१ टीएमसी ( ७० टक्के) वर गेला आहे. त्यामुळे जुलैमध्ये प्रथमच पुणेकरांची पाणी चिंता मिटली आहे. मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ७ टीएमसी होता. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल तीन पट अधिक पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत ५ टीएमसी पाणी सोडले आहे. शहराला धरणासाखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर, आणि खडकवासला धरणातून पाणी दिले जाते. या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता २९.५० टीएमसी आहे. दरवर्षी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैच्या दुसऱ्या आठवडयात पावसाला सुरूवात होते आणि ऑगस्टमध्ये चारही धरणे भरतात. यंदा २० मे पासूनपाणलोट क्षेत्रात पाऊस झाला आहे. जूनमध्येही मोठया प्रमाणात पाऊस झाला. यामुळे खडकवासला धरण १८ जून रोजीच भरले. आता, पानशेत धरणही ७० टक्के भरले असून वरसगाव धरण ७६ टक्के भरले आहे. टेमघर धरणात ६६ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे, चारही धरणे जुलै अखेरच भरण्याची शक्यता आहे. चिंता मिटली पुण्याला वर्षाला १७ ते १८ टीएमसी पाणी लागते. यंदा जुलैमध्येच शहराची वर्षभराची पाण्याची सोय झाली आहे. या चारही धरणातून जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना आणि सिंचन योजनांसाठीही पाणी दिले जाते. मॉन्सून सप्टेंबरपर्यंत असल्याने आणि यंदा घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण लक्षणीय असल्याने धरणे वेळेपूर्वीच १०० टक्के भरतील असा अंदाज आहे. पावसाचा विक्रम ? गेल्या वर्षी म्हणजे १ जून २०२४ ते ३१ मे २०२५ या काळातील पावसाच्या तुलनेत यंदा लक्षणीय पाऊस झाला आहे. यामुळे सप्टेंबरअखेर विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.