पुणेकरांनो सावधान! हेल्मेट नाही घातलं तर थेट कारवाई, RTO ने ५ महिन्यांत १३ हजार ४४९ जणांना ठोठावला दंड

प्रभात वृत्तसेवा
पुणे – विना हेल्मेट तसेच मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणे, जोरात वाहन चालविणे, विना सिटब्लेट यांसह वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांवर पुणे आरटीओच्या वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येते. त्यानुसार मागील पाच महिन्यांत तब्बल ८ हजार ६३९ विना हेल्मेट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याचे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सामाजिक संस्थाच्या मदतीने रस्ता सुरक्षेसंदर्भात विविध उपक्रम राबविले जातात.
नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी जनजागृती केली जात आहे. या माध्यमातून रस्ते अपघात कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरीही शहरात काही बेजबाबदार वाहनचालक सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडताना दिसतात. परिणामी अपघात, वाहतूक कोंडी या घटना वारंवार घडत आहे. विरुद्ध दिशने येणारी वाहने ही रस्ता अपघाताला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशा वाहनांवर प्रामुख्याने कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, सीट बेल्ट न घालणे, वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट न घालणे, मोबाईलवर बोलत वाहने चालविणे अशा वाहनांवरही कारवाई केली जात आहे.
मागील पाच महिन्यांत १३ हजार ४४९ जणांवर कारवाई..
एप्रिल ते ऑगस्ट २०२५ दरम्यान पुणे आरटीओकडून सीट बेल्ट न घालणे, वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट न घालणे, मोबाईलवर बोलत वाहने चालविणे अशा प्रकारच्या नियम तोडणाऱ्यांवर एकूण १३ हजार ४४९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या ८ हजार ६३९ तर जोरात वाहन चालविणाऱ्या १ हजार ९९१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.





