Pune News : ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’; ३ डिसेंबरला पुणेकर पुन्हा वाचनात रमणार
शांतता...पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात तीन डिसेंबरला सकाळी अकरा ते बारा या वेळेत नागरिकांनी आपल्या आवडीचे पुस्तक वाचून त्याचा फोटो अपलोड करावा.

Pune News : पुण्याच्या धावपळीच्या वातावरणात तीन डिसेंबरला सकाळी अकरा ते बारा या वेळेत पुस्तक वाचनाचे विश्व रंगणार आहे. शाळा-महाविद्यालये, कार्यालये, संस्था, मंडळे अशा ठिकाणी एकाच वेळी नागरिकांकडून पुस्तकांची पाने उलगडली जाणार असून, ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमातून संपूर्ण शहराला वाचन चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव १२ ते २० डिसेंबरदरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यंदा महोत्सवात अकराशे दालने असणार आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून पुस्तकांची उपलब्धता वाढविण्यासोबतच वाचन संस्कृतीचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘शांतता…. पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शहरातील अधिकाधिक नागरिकांना सामूहिक वाचनाच्या उपक्रमात सहभागी करून घेणे, हा त्यामागील उद्देश आहे. तीन डिसेंबरला सकाळी अकरा ते बारा या वेळेत नागरिकांनी आपण जिथे असू, तिथे आपल्या आवडीचे पुस्तक वाचायचे आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, ग्रंथालये, सरकारी आणि खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, बसस्थानके तसेच रेल्वे स्थानकांवरही या उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमात वैयक्तिक वाचनाबरोबरच शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक गणेश मंडळे, महिला गट, ज्येष्ठ नागरिक संघ, सहकारी गृहनिर्माण संस्था, रिक्षा संघटना, मंदिर संस्था, बँक फेडरेशन, व्यापारी संघटना आणि विविध व्यावसायिक संघटनांनाही सहभागी होता येणार आहे.
नृत्य प्रशिक्षण संस्था, सोसायटी फेडरेशन आणि अन्य संस्थांकडूनही सहभाग नोंदविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सवाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
वाचन करतानाचा फोटो काढून तो https://photoupload.pbf26.in या संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. त्यासाठी क्यूआर कोडची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहकार्य लाभत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
‘पुणे पुस्तक महोत्सव हा लोकांचा महोत्सव आहे. यंदा महोत्सवात अकराशे दालने असून, वाचन चळवळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. शांतता…पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात तीन डिसेंबरला सकाळी अकरा ते बारा या वेळेत नागरिकांनी आपल्या आवडीचे पुस्तक वाचून त्याचा फोटो अपलोड करावा. या उपक्रमातील व्यापक लोकसहभागातून पुण्याला पुस्तकांची राजधानी ही ओळख मिळवून देण्यासाठी मदत होईल.
– राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव







