Pune ZP election | जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर ; पूर्व हवेलीतील गट-गणात मोठे बदल

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेची 73 गट आणि 146 गणांची अंतिम प्रभाग रचना देखील प्रसिद्ध झाली. पूर्व हवेलीमध्ये प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्याने अंतिम प्रभाग रचनेत मोठे बदल पहावयास मिळाले आहेत.
सुधारित अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांनी कंबर कसली असून गावागावांमध्ये संवाद दौरा सुरु केला आहे. जिल्हा परिषदेच्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर तब्बल 217 हरकती नोंदवण्यात आल्या होत्या.
त्यावर संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकार्यांकडून अभिप्राय मागविण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना अहवाल सादर केल्यानंतर हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली आणि त्यामध्ये 115 हरकती आणि सूचना मान्य करण्यात आल्या.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांनी सुचवलेले बदल करून, सुधारित आराखडा पुन्हा त्यांच्याकडे पाठवला.विभागीय आयुक्तांनी सुचविलेले बदल तपासल्यानंतर प्रभाग रचनेला मान्यता दिली. त्यानुसार अंतिम रचना प्रसिद्ध झाली.महायुती आणि महाविकास आघाडी अशी निवडणूक होणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार हे निश्चित नाही.
त्यामुळे इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी करताना काळजी घेतली जात आहे. पक्ष चिन्हांचा वापर न करता बॅनरबाजी करत आपण निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचा संदेश दिला जात आहे. दरम्यान, युती आणि आघाडी झाली तर आपल्याला कोणाकडून संधी मिळेल याची चाचपणी केली जात आहे.
पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटातील गावे :
(लोणीकंद गण) – निरगुडी, वडगाव शिंदे, भावडी, तुळापुर, फुलगाव, लोणीकंद, (पेरणे गण) – वढू खुर्द, बकोरी, पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरीसांडस केसनंद-कोरेगावमूळ जिल्हा परिषद गटातील गावे : (केसनंद गण) – केसनंद, तळेरानवाडी, वाडेबोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, शिरसवडी, अष्टापूर, बिवरी, न्हावी सांडस, सांगवी सांडस. (कोरेगाव मूळ गण) – हिंगणगाव, शिंदेवाडी, भवरापूर, कोरेगाव मूळ, पेठ, नायगाव, प्रयागधाम, खामगाव टेक, टिळेकरवाडी आव्हाळवाडी-थेऊर जिल्हा परिषद गटातील गावे : (आव्हाळवाडी गण)-आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोलवडी, साष्टे, थेऊर वार्ड क्र. 1, 2. (थेऊर गण) – थेऊर वार्ड क्र. 3, 4, 5, 6, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची




