Pune ZP Election Results – तळेगाव ढमढेरे- रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला गट भाजपाने ताब्यात घेत इतिहास घडवला. भाजपाच्या उमेदवार दीपाली राहुल गव्हाणे यांच्या विजयामुळे गटात पहिल्यांदाच कमळ फुलले. हा निकाल केवळ मतदारांचा कौल नसून बदललेल्या राजकीय समीकरणांचे संकेत आहेत. राष्ट्रवादीचे तालुका आणि जिल्हास्तरीय नेत्यांची फळी असताना राष्ट्रवादीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्मचिंतनाची गरज आहे.तळेगाव गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पातळीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले होते. अनेक वर्षे एकसंध संघटना, स्थानिक नेतृत्वामुळे हा गट अभेद्य समजला जात होता. परंतु राष्ट्रवादीतील फूट आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी हीच राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत ठरली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी विभागणी झाली. तालुका आणि गावपातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक यांच्यात थेट विभागणी झाली. दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे संघटन वाढवण्याचा प्रयत्न केला. तालुकाध्यक्षांसारखी महत्त्वाची पदे दोन्ही गटांकडून तळेगाव परिसरात दिली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा, मतभेद वाढले. त्यातच लोकसभा निवडणुकीत जनाधार हा शरद पवार यांच्या बाजूने झुकला होता. त्याचा लाभ हा शिरूर लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल काेल्हे यांना झाला. मात्र, हाच जोर विधानसभा निवडणुकीत ओसरला. विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून आमदार ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार अशोक पवार मैदानात उतरले होते. दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले. ज्ञानेश्वर कटके यांच्या विजयामुळे तालुक्यात त्यांचे राजकीय वजन वाढले, मात्र, दोन्ही गटांतील दरी कायम राहिली आहे. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. जिल्हा परिषद पुणे मनोमिलन पण, एकोपाच नव्हता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी वरिष्ठ पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांनी काही ठिकाणी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. शिरूर तालुक्यातही हा निर्णय घेतला. परंतु स्थानिक कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नाही. उमेदवारीत कोणाला झुकते माप मिळाले, कोणाची उपेक्षा झाली, या मुद्द्यांवरून नाराजी वाढली होती. त्याचा फटका शरद पवार यांच्या पदाधिकारी, समर्थकांना बसला. त्यातूनच नाराजीची सुप्त लाट गावागावांत दिसून आली. दोन्ही राष्ट्रवादीची एकजूट झाली. मात्र, एकोपा नसल्याचा फटका बसला. त्यातून भाजपने या संधीचा लाभ उठवत तळेगावची जागा पटकावली. राष्ट्रवादीतील खदखद उफाळली तळेगाव ढमढेरे गटातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली. परंतु त्या गटाबाहेरील असल्याची भावना निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेबाबतची नाराजी होती. स्थानिक इच्छुकांना संधी न मिळाल्याची खदखद उफाळून आली. बांदल यांच्या उमेदवारीला उघड आणि पडद्याआड विरोध झाला. त्याचवेळी पंचायत समितीच्या उमेदवारीवरूनही स्थानिक पातळीवर मतभेद निर्माण झाले. परिणामी राष्ट्रवादीच्या प्रचारयंत्रणा विभागल्या गेल्या. कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. तळेगाव गटातील चौरंगी लढतीत बंडखोरी, मतविभाजनाचा फटका राष्ट्रवादी आणि भाजपला बसणार हे निश्चित होते. मात्र, भाजपकडून उमेदवार डावलल्याने जयेश शिंदे यांनी पत्नीला अपक्ष उभे केले. राष्ट्रवादीने राहुल कर्पे यांची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवली. दोन्ही उमेदवारीमुळे राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही पक्षांचे पारंपरिक मते विभागली; मात्र, एकसंध प्रचारामुळे भाजपाला त्याचा तुलनेने कमी फटका बसला आहे. याचा सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादीला बसला आहे. भाजपाची रणनीती प्रभावी भाजपाने नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे. गावनिहाय संपर्क, कार्यकर्त्यांची जबाबदारी स्पष्ट, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, नाराज मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे मत परिवर्तन करणे, आदी कारणांमुळे भाजपाने मोठा मतदारवर्ग आपल्या बाजूला खेचून घेतला. काही नाराज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, चौरंगी लढतीत मत विभाजन झाले. जयेश शिंदे आणि राहुल कर्पे यांचे स्थानिक पातळीवर व्यक्तिगत संपर्क असूनही संघटनात्मक ताकद, प्रचारयंत्रणा, व्यापक पाठबळ यांचा अभाव जाणवला. परिणामी चार वर्षांची तयारी असूनही अपेक्षित यश मिळाले नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. शिंदे आणि कर्पे यांच्या समर्थकांत उमेदवारी प्रक्रियेबाबत नाराजी दिसून येत आहे.