Pune ZP Election : हिंजवडीत भाजप आणि राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन; भव्य रॅलींनी प्रचाराची सांगता
Pune ZP Election : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हिंजवडीत रॅली; हनुमान मंदिरात 'विजयी संकल्प' सभांनी घुमला विजयाचा विश्वास.

Pune ZP Election – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला अखेर गुरुवारी (दि. ५) सायंकाळी पूर्णविराम मिळाला असून, हिंजवडी-माण गट आणि गणात उमेदवारांच्या भव्य सांगता सभा, पदयात्रा व रॅलींनी प्रचाराचा शेवट गाजत वाजत झाला. गेली आठ दिवस सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अन प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी गाठीभेटींनी परिसर पिंजून काढला. हिंजवडी-माण गण आणि गटातील भाजप उमेदवारांनी दुपारी तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन भव्य पदयात्रा काढली.
भाजपने ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि झेंडे यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवाजी चौकांतून निघालेल्या रॅलीची गावठाणातील हनुमान मंदिरात विजयी संकल्प सभेने सांगता झाली.उद्या शनिवारी (दि. ७ ) जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकीचे मतदान होणार असून त्याबाबत प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे.
प्रचाराची सांगता होताच मतदारांचे लक्ष आता मतदानाकडे केंद्रित झाले आहे. कोणाच्या शब्दांवर जनता शिक्कामोर्तब करणार आणि कोणाकडे जनतेचा कल राहणार? याची उत्सुकता सर्वत्र असून, हिंजवडी-माण गट व गणातील लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
या गटात सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवार दिल्याने कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. आयटीनगरी असलेल्या हिंजवडी गावातून जिल्हा परिषदेसाठी तीन उमेदवार असल्याने मत विभाजनाचा फायदा कुणाला होणार याकडे जाणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.





