पुणे – क्षेत्र निवडाताना त्या कामातून मिळणारा आनंद आणि पैसा याचा विचार करा. मी राजकारणात पडलो आणि अडकलो, आता बाहेरही पडता येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी राजकारणाच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. राजकारणापेक्षा प्रशासकीय सेवा किंवा स्वत:चा व्यवसायाबाबत विचार करण्याबाबत पवारांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण विभागाचे सभापती रणजित शिवतरे, सभापती प्रमोद काकडे, बाबूराव वायकर, सारिका पानसरे, पूजा पारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, प्रकल्प संचालक लांगोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वखारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना कामथे, अरुणा थोरात, भरत खैरे, शरद लेंडे, शंकर मांडेकर, हनुमंत बंडगर, अभिजित तांबिले उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, जोपर्यंत जनतेने आम्हाला खर्चीवर बसवले तोपर्यंत आहोत, ज्यादिवशी घरी बस म्हटल्यावर आम्ही चाललो. मात्र, प्रशासकीय सेवेतील अधिकारी निवृत्त होईपर्यंत खुर्चीवर असतो. प्रभावी अंमलबाजवणी करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे या. ज्या क्षेत्रात उतराल त्यात आपल्या आई-वडिलांचे नाव करा. विश्वासार्हता संपली की माणूस संपतो.
मित्र निवडतांना चांगले मित्र निवडा. करोनामध्ये विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सगळेच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकले नाहीत. पण काळाप्रमाणे सर्वांनी बदलले पाहिजे. मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात केला पाहिजे, असे पवार यांनी सांगितले. प्रास्ताविक उपाध्यक्ष शिवतरे यांनी केले. शिक्षणाधिकारी कुऱ्हाडे यांनी आभार मानले.
व्यायाम करा, व्यासपीठावर बसलेल्यांची पोट सुटली?
सकाळी लवकर उठून शरिरासाठी आवश्यक असलेला व्यायाम करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. “तुमच्या व्यासपीठावर बसलेल्यांना सांगा’, असे विद्यार्थी म्हणतील असे सांगत अजित पवार यांनी विद्यार्थ्यांबरोबरच व्यासपीठावरील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनाही “पोट सुटल’ व्यायाम करा, असा सल्ला दिला.