Pune Zilla Parishad – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ७३ पैकी ५१ जागांवर घवघवीत यश मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. आता सर्वांचे लक्ष बुधवारी (दि. १८ मार्च) होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडीसाठी प्रस्थापित राजकीय घराण्यांतील वारस आणि पक्षाचे निष्ठावान जुने जाणते सदस्य यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, बारामती, दौंड, भोर, मुळशी, आंबेगाव तालुक्यांतील इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन माजी आमदारांची मुले निवडून आले आहेत. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील- ठाकरे सलग दुसऱ्यांदा बावडा गटातून निवडून आल्या आहेत. दुसरीकडे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवून आपली क्षमता सिद्ध केली आहे. भोरचे माजी आमदार काशिनाथ खुटवड यांचे चिरंजीव विक्रम खुटवड यांनीही भोंगवली झेडपी गटातून विजय मिळवत आपला दावा प्रबळ केला आहे. केवळ नवे चेहरेच नव्हे, तर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या ज्येष्ठ सदस्यांनीही अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावली आहे. यामध्ये दौंडचे वीरधवल जगदाळे, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील, मुळशीचे शांताराम इंगवले आणि भोरचे विक्रम खुटवड यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अध्यक्षपद हे पुढील अडीच वर्षांसाठी ‘सर्वसाधारण’ गटासाठी राखीव असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्ह्याची राजकीय धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीसाठी सर्व अधिकार देण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषद त्यामुळे त्या अध्यक्षपदाच्या निवडीतून काय राजकीय संदेश देतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रस्थापित घराणेशाहीला महत्त्व द्यायचे की पक्ष संघटना बळकट करण्यासाठी एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी द्यायची, यावर सध्या पक्षात खलबते सुरू आहेत. येत्या बुधवारी होणाऱ्या या निवडीपूर्वी जिल्ह्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार, हेच आता पाहावे लागणार आहे. ज्येष्ठ सदस्यांना संधी मिळणार? जिल्हा परिषद निवडणुकीत दौंड, आंबेगाव, भोर, इंदापूर तालुक्यात निवडून आलेल्यांमध्ये ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यात खडकी गटातून वीरधवल जगदाळे, विष्णुकाका हिंगे, विवेक वळसे पाटील हे तिघेजण प्रबळ दावेदार आहेत. त्यात या तिघांचा निकष सरस ठरत असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवड करताना त्यांचा मोठा कस लागणार आहे. इच्छुकांकडून लॉबींग जोरात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून लॉबींग केले जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सर्वाधिकार दिले असताना काही सदस्यांकडून दबाव वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. अध्यक्षपदाची निवड करताना सुनेत्रा पवार यांना समतोल साधत राजकीय पटलावर बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. यात सुनेत्रा पवार यांची खरी कसोटी आहे.