Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेत ‘मलईदार’ पदांसाठी फिल्डिंग; कोणाची लागणार वर्णी आणि कोणाचा पत्ता कट?
Pune Zilla Parishad : कृषी, बांधकाम आणि समाजकल्याण या महत्त्वाच्या विभागांसाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच; कोअर कमिटीच्या बैठकीकडे लक्ष.

Pune Zilla Parishad – पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर आता जिल्हा परिषद सदस्यांनी चार विभागांतील एकतरी सभापती पद पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. गुरुवार (दि. २) एप्रिल रोजी होणाऱ्या विषय समित्यांच्या सभापती निवडी होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेत ५१ जागांसह निर्विवाद वर्चस्व आहे. या निवडी करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना तालुक्यांचा समतोल साधून निवडी कराव्या लागणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या सत्तेत समतोल राखण्यासाठी राष्ट्रवादीकडून आतापर्यंत दौंड तालुक्याला अध्यक्षपद, आंबेगावला उपाध्यक्षपद, तर इंदापूरला गटनेतेपद देण्यात आले आहे. मात्र, विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी चुरस वाढली असून, २० हून अधिक सदस्यांनी दावेदारी सांगितली आहे. यामध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकून देणाऱ्या मावळ तालुक्याला महत्त्वाचे पद मिळावे, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे. आता जुन्याजाणत्यांना संधी मिळणार, की नव्या चेहऱ्यांना वाव मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इच्छुकांची संख्या पाहता ही निवड प्रक्रिया पक्षश्रेष्ठींसाठी मोठी कसरत ठरणार असल्याचे दिसत आहे.
इच्छुकांत मोठी चुरस
कृषी, बांधकाम, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण या समित्यांचा ग्रामीण भागातील विकासकामांवर थेट प्रभाव असतो. त्यामुळे या मलईदार मानल्या जाणाऱ्या सभापतिपदांसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. सभापतिपदाच्या शर्यतीत शांताराम इंगवले, करण खलाटे, विष्णू हिंगे, रुपाली झेंडे, डॉ. गायत्री खळदकर, विक्रम खुटवड, जितेंद्र बढेकर, मोनिका हरगुडे आणि छाया तांबे यांची नावे आघाडीवर आहेत. त्यांनी आतापासूनच वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
अंतिम अधिकार सुनेत्रा पवार यांनाच
सभापती निवडीमध्ये प्रादेशिक समतोल आणि निवडणुकीतील कामगिरी हे दोन मुख्य निकष राहण्याची शक्यता आहे. ज्या तालुक्यांना मुख्य पदे मिळालेली नाहीत, त्यांना प्राधान्य देण्याचे धोरण पक्षाकडून अवलंबले जाऊ शकते. सभापतिपदासाठी आतापर्यंत सुमारे २० अर्ज प्राप्त झाले असून, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्व नावांवर शिक्कामोर्तब होईल. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
दौंड, आंबेगाव शर्यतीतून बाहेर
दौंड तालुक्यातून खडकी जिल्हा परिषद गटाचे सदस्य वीरधवल जगदाळे यांना अध्यक्षपदाची, तर आंबेगाव तालुक्यातील पारगावतर्फे- अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे सदस्य विवेक वळसे पाटील यांना उपाध्यक्षपदाची संधी दिली आहे. त्यामुळे हे दोन तालुके आता शर्यतीतून बाहेर पडतील. भोरचे आमदार शंकर मांडेकर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुरंदरचे राष्ट्रवादीचे तालुकास्तरीय नेते यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत असल्याने कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.






