Pune : गुंतवणुकीचा परतावा न दिल्याने तरुणाचे अपहरण

पुणे – शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत फसवणूक झाल्यानंतर गुंतवणूक घेणाऱ्या पुण्यातील एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. त्याला अकलूज येथील शेतात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आठ गुंतवणूकदारांसह त्याच्या साथीदारांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अपहरण झालेला तरुणाचे नाव इम्रान नदिम चौधरी (वय. ३१ रा. चंदननगर) असे आहे. तो मूळचा अकलूज येथील आहे. चौधरी याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याने आणि त्याच्या भावाने बुल्स कॅपिटल या कंपनीमार्फत अकलूजमधील गुंतवणूकदारांकडून सुमारे २५ कोटी रुपये जमा करून व्हिप्स (WHIPS) या शेअर मार्केटशी संबंधित कंपनीत गुंतवले होते. दरम्यान, २०२३ मध्ये व्हिप्स कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केल्यानंतर कंपनीचे व्यवहार थांबले आणि गुंतवणूकदारांचा परतावा मिळणे बंद झाला. परिणामी, गुंतवणूकदारांकडून चौधरी बंधूंवर दबाव वाढत गेला.
अपहरण आणि मारहाणीचा आरोप
२४ मे रोजी चंदननगर परिसरातून चौधरी हे डॉक्टर मित्रासोबत जात असताना मुंढवा सिग्नलजवळ त्यांची गाडी अडवून चार जणांनी त्यांचे अपहरण केले. चौधरी यांच्या तक्रारीनुसार, आरोपी चैतन्य तोरसकर, लकी, अण्णा आणि अजित तोरसकर यांनी त्यांना अकलूजमधील एका शेतात तीन दिवस डांबून ठेवले. या कालावधीत चौधरी यांना लाकडी दांडके, लोखंडी पाईप, रस्सी आदींचा वापर करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर, त्यांच्याकडून जबरदस्तीने कागदपत्रांवर सह्याही घेतल्याचा आरोप आहे.
धमकी व वाढीव मागणी
चौधरी यांनी आरोप केला की, मूळ गुंतवणुकीच्या ४ कोटी रुपयांवर १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही, तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार करू, अशी धमकीही दिली गेली.
पोलिस कारवाई सुरू
चौधरी यांनी सोलापूरमध्ये काही काळ लपून राहिल्यानंतर पुण्यात परत येऊन चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चैतन्य तोरसकर, अजित तोरसकर, लकी, अण्णा, अक्षय, राजा नाईकवडी यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध अपहरण, मारहाण, जबरदस्ती आणि धमकी यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
व्हिप्स कंपनीचा मालक मंगेश कुटे याने चौधरीसारख्या अनेक एजटांच्या माध्यमातून करोडो रुपये गुतंवणुकीसाठी घेतले होते. ईडीचा छापा पडल्यावर तो आणि त्याचे सहकारी मागील दोन वर्षे दुबई येथे पळून गेले आहेत. त्याचे कार्यालय आणि मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. मात्र त्याच्यासाठी काम करणारे एजंट चांगलेच संकटात आले आहेत.





