पुणे : समान पाणी मिळणार, तर मीटर कशाला?

पुणे- पुणेकरांना 24 तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी 24 बाय 7 योजना आखण्यात आली होती. योजनेचे नाव बदलून आता “समान पाणी वाटप योजना’ असे करण्यात आले आहे.
याचाच अर्थ सर्व पुणेकरांना समान दाबाने समान पाणीपुरवठा होईल, असे अपेक्षित आहे. असे असताना सुमारे 500 कोटी रुपये खर्च करून पाण्याचे मीटर कशासाठी? असा सवाल कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी उपस्थित केला आहे. समान पाणी मिळणार आहे, तर मीटर खरेदी नेमकी कोणासाठी? असा सवालही बागुल यांनी उपस्थित केला आहे.
“या योजने अंतर्गत प्रत्येक नळजोडास पाणी मीटर बसवले जाणार आहे. त्या वापरानुसार पाण्याचे बिल दिले जाणार होते. त्यासाठी मीटर पद्धती योग्य होती. परंतु सर्वांना समान पाणीपुरवठ्याचा महापालिकेचा उद्देश असेल, तर त्यासाठी मीटर बसविण्याची गरजच नाही. जर का पाण्याचा एकूण किती वापर झाला आहे. याची माहिती हवी असेल तर पाण्याचा मूळ स्रोत असणाऱ्या मोठ्या पाइपलाइन आहेत. त्यावर जर मोठे मीटर बसवले, तर दररोज किती पाणी दिले याचा आकडा मिळू शकतो.
त्यासाठी प्रत्येक घराला मीटर लावणे गरजेचे नाही. आता काही ठिकाणी असे मीटर लावले आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे लोकांनी ते काढले आहेत. त्यामुळे मीटर बसवण्याबाबत प्रशासनाने फेरविचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,’ असेही बागुल म्हणाले.





