Pune :सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम रेंगाळत सुरू

पुणे – सिंहगड रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी १५ जूनला खुला होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, पावसानंतर या कामाचे नियोजन कोलमडल्याची स्थिती आहे. त्यामुळे माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानचा उड्डाणपूल सुरू होण्यास किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
सिंहगड रस्त्यावर 118 कोटी रुपये खर्च करून उड्डाणपुलाचे काम सप्टेंबर 2022 मध्ये सुरू झाले. यामध्ये राजाराम पूल चौक, विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटर या दोन टप्प्यातील उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले. या दोन्ही पुलांचे लोकार्पण अनुक्रमे 26 जानेवारी 2025 आणि 1 मे 205 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे.
आता, तिसऱ्या टप्प्यातील माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानच्या सुमारे दीड कि.मी. उड्डाणपुलाचे उद्घाटन 15 जूनला होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. परंतु, जून महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काम रेंगाळत सुरू आहे. हे काम जुलै महिना अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.





