PUNE : सनसिटी-कर्वेनगर उड्डाणपुलाचे काम सुरू

पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सनसिटी ते कर्वेनगर असा पूल नदीवर उभारण्यात येत आहे. पण, हे काम संथ सुरू आहे. पावसाळ्यानंतर आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मे 2023 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, त्यानंतर जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्याने काम बंद ठेवण्यात आले.
दरम्यान, हे काम नदीपात्रात असल्याने खांबांसाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाण्याचे झरे लागले आहेत. त्यामुळे काम करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय, सहा महिन्यांत संथ कामामुळे एकही खांब उभा राहिलेला नाही. दरम्यान, या कामासाठी दोन वर्षांची मुदत निर्धारित करण्यात आली आहे.
सिंहगड रस्त्यावरून कोथरूड अथवा भूगाव तसेच कर्वेनगरकडे जायचे असल्यास नागरिकांना राजाराम पुलावरून जावे लागते. त्यामुळे जवळपास पाच किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. मात्र, हा पूल झाल्यास सनसिटी आणि कर्वेनगर हा भाग पाच मिनिटांच्या अंतरावर असणार आहे. महापालिकेने या कामासाठी निविदा काढली होती.
मात्र, काम मिळालेली कंपनी दिवाळखोरीत गेल्याने त्यांच्याकडून काम काढून घेत नवीन कंपनीस काम देण्यात आले आहे. मात्र, या कामाला अपेक्षित वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. सिंहगड रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या कामाचा वेग वाढवण्याची मागणी होत आहे.
असा आहे पूल
- पुलाची लांबी 350 मीटर
- पुलाची रुंदी 30 मीटर
- सनसिटी ते कर्वेनगर जोडणार
- सिंहगड रस्त्यावरील कोंडी फुटणार





