Pune: काम अर्धवट, बिल मात्र पूर्ण; मनपाच्या दोन विभागात समन्वय नसल्याचे उघड

बिबवेवाडी – गुलटेकडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलाखाली फ्लोव्हर बेडची नासाडी होऊ नये याकरिता डायस प्लॉट ते गिरिधर भवन दरम्यान फेन्सिंग जाळी लावणे आणि फ्लोव्हर बेड विद्युतविषयक दुरुस्तीसाठी महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
मात्र, प्रकल्प विभाग आणि उद्यान विभाग महापालिकेच्या दोन विभागांमध्ये समन्वय नसल्याने फ्लोव्हर बेड लावणे व विद्युतविषयक दुरुस्तीचे काम करण्याआधीच केवळ फेन्सिंग जाळी बसवून काम अर्धवट बिल मात्र पूर्ण घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
या जाळ्यांच्या कामासाठी ३२ लाख रुपयांचा खर्च आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. तसेच, उर्वरित रक्कम उद्यान विभागामार्फत खर्च करून कामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, १०० मीटर पेक्षाही कमी अंतराची फेन्सिंग जाळी बसविण्यासाठी एवढा खर्च कसा येतो? त्यात फ्लोव्हर बेड लावणे व विद्युतविषयक कामच झालेले नसेल आणि ते होणार नसेल, तर या फेन्सिंग जाळ्यांचा उपयोग काय? मोकळ्या जागेला फेन्सिंग केले आहे का? नागरिकांच्या कररूपी पैशांच्या अपव्यय कशासाठी केला? असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
“हे काम प्रकल्प विभागाचे असून, उद्यान विकसित करणेही त्यांच्या अखत्यारितच येते. मात्र, प्रकल्प विभागाकडून हे काम विद्युत आणि उद्यान विभाग करणार आहे. प्रकल्प विभाग आता काहीही करणार नसल्याचे सांगण्यात येते.” – अशोक घोरपडे, मुख्य उद्यान निरिक्षक
“फ्लोव्हर बेडचे काम उद्यान विभागामार्फत करण्यात येणार आहे. विद्युत विभागही लवकरच काम करणार आहे. पण, ही दोन्ही खाती कधी काम सुरू करणार आहेत. याबाबत कल्पना नाही.” – गौरी गवते, शाखा अभियंता, प्रकल्प विभाग.





