पुणे : ‘आठ-अ’तून महिलांना मालमत्तेत हक्क

पुणे- महिलांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी पुणे जिल्हा परिषदेने घेतलेल्या विशेष मोहिमेमध्ये ग्रामीण भागातील तब्बल 6 लाख 42 हजार 86 महिलांना पतीच्या मालमत्तेत हक्क मिळाला आहे. मात्र, एकीकडे हा हक्क मिळाला असला तरी, दुसरीकडे आजही 40 टक्के घरांमध्ये महिलांना त्यांचा हक्क दिला गेलेला नाही. त्यामुळे राहिलेल्या कुटुंबांनी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींनी महाफेरफार अभियानांतर्गत मिळकत पत्रिकेवर (आठ-अ) महिलांची नावे समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेला अनेक कुटुंबांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वामित्व योजनेंतर्गत घरातील गृहिणींना मालमत्तेची मालकी हा सक्षमीकरणाचा महत्त्वाचा भाग असून, यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींना सूचना देऊन त्यांच्या हद्दीतील मिळकत पत्रिकेवर महिलांची नावे समाविष्ट करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतींनी मिळकत पत्रिकेवर महिलांची नावे लावण्याची प्रक्रिया सुरू केली.
यामध्ये मिळकत पत्रिका किंवा आठ-अ यांचे वितरण, त्यावर महिलांचे नाव देणे, “आठ अ’मध्ये महिलांची नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज घेणे प्रक्रियेला वेळ लागत असला तरी चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात “आठ अ’ मिळकतीची एकूण संख्या 10 लाख 11 हजार एवढी असून, त्यापैकी आतापर्यंत 6 लाख 42 हजार 86 जणांचे आठ अ वर महिलांची नावे समाविष्ट झाली आहेत. शिल्लक कुटुंबांनीदेखील त्वरित पुढाकार घेऊन मिळकतीमध्ये महिलांची नावे समाविष्ट करावीत, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले.





