Pune : अकरावी प्रवेशाचा आजचा मुहुर्त साधणार ?

पुणे – राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु केली असून आता उद्याचा म्हणजे सोमवारचा (दि.२६) मुहुर्त तरी ही प्रवेश प्रक्रिया साधणार का, असा प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित करत आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावीचा निकाल लवकर म्हणजेच १३ मे रोजी जाहीर केला. यावर्षी राज्यात प्रथमच अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाच्या पहिल्या प्रवेश फेरीचे वेळापत्रकही जाहीर केले होते. त्यानुसार १९ मे ते १३ जून या कालावधीत ही फेरी राबविण्यात येणार होती.
विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २१ मे रोजी संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे काहीच कामकाज करता आले नाही. संकेतस्थळच ठप्प पडल्यामुळे पहिल्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार २६ मे पासून ते २० जून या कालावधीत ही फेरी राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी राज्यातील ९ हजार ३७६ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केलेली आहे. त्यात एकुण २० लाख ९२ हजार ३५० प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. कॅप अंतर्गत प्रवेशासाठी १८ लाख ७७ हजार ८३९ तर कोट्याअंतर्गत २ लाख १४ हजार ५११ एवढ्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत.
आता विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी संकेतस्थळ सुरळीतपणे सुरु होण्याची आवश्यकता आहे. यंत्रणेत कोणताही बिघाड होणार नाही याची दक्षताही घ्यावीच लागणार आहे.
प्रवेश प्रक्रियेवर एक नजर
नोंदणीकृत कॉलेज–९ हजार ३७६
प्रवेश जागा– २० लाख ९२ हजार ३५०
कॅप फेरीसाठी जागा– १८ लाख ७७ हजार ८३९
कोट्यातील प्रवेश जागा–२ लाख १४ हजार ५११





