pune : मसापमधील वाद आज मिटणार?
Pune:

कार्यकारिणीच्या बैठकीकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष
pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेतील (मसाप) वादावर आज (मंगळवार दि. २७) होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत तोडगा निघणार का, याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रक्रियात्मक त्रुटी, स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांना बजावलेली कारणे दाखवा नोटीस आणि प्रलंबित प्रशासकीय निर्णयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीला अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष, स्थानिक कार्यवाह आणि जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. वार्षिक ताळेबंद व अंदाजपत्रकास मंजुरी, चार उपाध्यक्षांची निवड, स्वीकृत सदस्य निवड आणि ठाणे जिल्हाप्रमुखाच्या रिक्त पदावर नियुक्ती, असे विषय बैठकीच्या विषयपत्रिकेवर आहेत.
महाजन यांनी १४ ऑक्टोबरला नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनातील प्रक्रियात्मक त्रुटींवर आक्षेप घेऊन पदाधिकारी बैठकीतील पूर्वचर्चा, आवश्यक मान्यता, सभेच्या सूचनेवरील तारखा आणि जावक क्रमांकांतील विसंगतीकडे लक्ष वेधले होते. लेखापरीक्षण अहवाल कार्यकारिणीसमोर मांडून त्याच्या प्रती उपलब्ध करून देण्याची मागणीही केली होती.
आ आक्षेपानंतर वार्षिक सभा पुढे ढकलली व प्रमुख कार्यवाह स्वाती महाळक यांनी महाजन यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने वाद चिघळला. आता बैठकीत या प्रकरणावर काय भूमिका घेतली जाते, याला महत्त्व आहे.
दरम्यान, उपाध्यक्षांची निवड सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत वादावर तोडगा निघण्यासोबतच प्रलंबित नियुक्त्यांबाबतही निर्णय होण्याची उत्सुकता आहे.





