पुणे- सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे काम करतानाच महापालिकेकडून मेट्रोचेही खांब उड्डाणपुलाच्या उंचीपर्यंत उभारले जाणार आहेत. त्यात सुमारे 35 ते 40 खांबांचा समावेश आहे. महापालिकेचा उड्डाणपूल आणि मेट्रोचे खांब थोड्या अंतराने एकाच ठिकाणी येत असल्याने हे काम पूलाच्या कामासोबतच करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शेवटच्या मुख्यसभेत झाला होता. त्यानुसार हे काम केले जाण्याची शक्यता असून त्यासाठी 18 ते 20 कोटींचा वाढीव खर्च तूर्तास महापालिका करणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली. त्यासाठी महामेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली असून दोघांनी उड्डाणपूल तसेच मेट्रो मार्गाचा आराखडा विचारत घेऊनच या कामास तत्वत: मान्यता दिली आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून सुमारे 135 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल उभारला जाणार आहे. मात्र, त्याच मार्गावर मेट्रोचा प्रस्तावित मार्गही आहे. त्यामुळे या पूलाच्या भूमीपूजच्या वेळी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मेट्रो आणि महापालिकेच्या पूलाचे खांब एकत्र करावे अशा सूचना केल्या. त्यानंतर दोन महिन्यांनी हे काम एकत्र करणे शक्य नसल्याने महापालिकेने पूलाचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत या पूलाच्या मार्गात मेट्रोचे 103 खांब येत असून पालिकेचे सुमारे 70 खांब आहेत. या खांबांमध्ये महापालिकेच्या पूलाचे आणि मेट्रोचे जवळपास 38 ते 40 खांब जवळ जवळ येत आहेत. प्रामुख्याने पूल उतरण्याच्या रॅम्पजवळ हे खांब येत असून सहा ठिकाणी पूलाच्या रॅम्पजवळ हे खांब आहेत. त्यामुळे भविष्यात मेट्रोला हे खांब उभारायचे झाल्यास पूलाचे रॅम्प तोडावे लागतील. त्यामुळे पालिकाच रॅम्पजवळचे खांब करणार असून तसा प्रस्ताव महामेट्रोला देण्यात आला आहे. तर, महामेट्रोने त्यास मान्यतही दिली आहे.
तूर्तास खर्च पालिका उचलणार
या खांबांचा खर्च तूर्तास महापालिका करणार आहे. या खांबांसाठी जवळपास 18 ते 20 कोटींचा वाढीव खर्च आहे. महापालिकेच्या मुख्यसभेत मान्य करण्यात आलेल्या याबाबतच्या प्रस्तावात हा खर्च मेट्रोने करावा असे नमूद केले आहे. मात्र, मेट्रोच्या या विस्तारीत मार्गाचा केवळ आराखडा तयार झाला असून अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे मेट्रो हा खर्च प्रत्यक्षात सिंहगड रस्त्यावर प्रकल्प मंजूर झाल्यावरच देणार आहे. त्यामुळे, महापालिकेनेच हा खर्च करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.