पुणे यंदाही तुंबणार!

पुणे : पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाले सफाईची कामे 95 टक्के पूर्ण केल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. मात्र, अनेक नाल्यांमधील एक दगडही उचचला गेला नसल्याचे दृश्य आहे. कर्वे रस्त्याकडून येणारे पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात राडारोडा तसेच घाण साचली आहे. या नाल्याची सफाईच झालेली नाही. शिवाय अनेक असे नाले असून तेथे काहीच काम झालेले नसतानाही प्रशासनाकडून मात्र कामे झाल्याचे सांगण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरवर्षी पावसाळापूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, कल्व्हर्ट, पावसाळी वाहिन्या आणि गटरांची स्वच्छता केली जाते. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर निविदा मागविली जाते. मात्र, कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत नसल्याने आणि अखेरच्या टप्यात अतिशय घाईगडबडीत उकरण्यात येत आहे. त्याच वेळी केवळ ठराविक आणि नागरिकांच्या नजरेस पडतील, अशा नाल्यांचीच सफाई करण्यात येत असल्याचे चित्र आहे. या कामासाठी महापालिका प्रशासनाने यंदाही पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांसाठी वेगवेगळ्या 28 निविदांद्वारे 11 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. या निविदाही दरवर्षीप्रमाणे कमी दरानेच आलेल्या आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून 31 मेअखेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, ही मुदत संपून आठवडा झाला आहे.
नाले सफाईच्या कामांचा दररोज आढावा घेतला जात आहे. आतापर्यंत 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, एखादा नाला सफाईच केलेला नसेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. या सफाई न झालेल्या नाल्याची तातडीनं पाहणी केली जाईल.
डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, मनपा





