पुणे । खडकवासल्याचा गड यंदा कोण जिंकणार ? महाविकास आघाडी की महायुती ?

धिरेंद्र गायकवाड
कात्रज – बारामती लोकसभा निवडणुकीत निर्णायक घटक म्हणून ठरलेला खडकवासला विधानसभा मतदारसंघ भाजप आणि राष्ट्रवादीच्या गटांमध्ये राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. अलिकडच्या वर्षांत भाजपकडे जागा असूनही खडकवासला हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात हवेली तालुक्यातील खेडशिवापूर, नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला गाव (प्रभाग क्र. 148) आणि कोथरूड महसूल मंडळातील काही भाग तसेच शिवणे गाव, उत्तमनगर आणि कोपरे गाव यांचा समावेश होतो. या मतदार संघात शहरी (70%) आणि ग्रामीण (30%) भागांचे मिश्रण आहे.
खडकवासला मतदारसंघ २००९ मध्ये स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत गोल्डन आमदार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. मात्र, २०११ मध्ये त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली.
भाजपने नवोदित व माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली, त्यांच्या विरोधात रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी निवडणूक लढविली. यामध्ये तापकीर यांनी विजयी होत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आणला.
खडकवासलामधून इच्छुक उमेदवार…
– राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) सचिन दोडके
– राष्ट्रवादीचे किशोर ऊर्फ बाळा धनकवडे
– राष्ट्रवादीचे सोपान ऊर्फ काका चव्हाण
– माजी जि. प. सदस्य नवनाथ पारगे
– शिवसेना (शिंदे गट) रमेश कोंडे
– भाजपचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप
– भाजपचे दीपक नागपुरे
– भाजपचे दिलीप वेडे पाटील
– दिवंगत रमेश वांजळे यांचा मुलगा मयूर वांजळे
नवीन मतदार निर्णायक ठरणार…
खडकवासला मतदारसंघात प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नव मतदार आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतील. आमदार भीमराव तापकीर यांना गेल्या तीन निवडणुकांमध्ये २०११, २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक जिंकली.
२०१९च्या निवडणुकीत या मतदारसंघात एकूण ४,८७,१०२ मतदार होते. तापकीर यांना १,२०,५१८ मते मिळवत विजयी झाले, राष्ट्रवादीचे सचिन शिवाजी दोडके यांना १,१७,९२३ मते मिळाली होती, ते २,५९५ मतांच्या फरकाने पराभूत झाले होते.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यंदा दोडके यांना पुन्हा संधी देतील, अशी चर्चा आहे. तर, भीमराव तापकीर यांना भाजप संधी देणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, याबाबतही चर्चा आहे.
तापकीर यांना उमेवारी नको…
भाजपकडून शहरातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली. यावेळी खडकवासदा मतदार संघातील माजी पदाधिकारी तसेच काही माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा पक्षाच्या निरीक्षकांसमोरच विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी देण्यास कडाकडून विरोध केला आहे.
तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही एकत्र काम करू पण मात्र तापकीर उमेदवार नकोत, असा सूर पदाधिकाऱ्यांनी लावून धरला आहे. त्यामुळे मतदार संघातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मागील निवडणूक निकाल :
2019 : भीमराव धोंडीबा तापकीर (भाजप) – १,२०,५१८ मत
2014 : भीमराव धोंडीबा तापकीर (भाजप) – १,११,५३१ मत
2009 : रमेश हिरामण वांजळे (मनसे) – ७९,००६ मत





