pune : कोण भेदणार भाजपचा बालेकिल्ला?

नवीन चेहर्यांना संधी, की अनुभवी उमेदवारांनाच प्राधान्य
पुणे – शहराच्या मध्यवर्ती पेठांचा समावेश असलेला आणि भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 25 शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई, आगामी महापालिका निवडणुकीत सर्वांच्या नजरेत आहे. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून चारही भाजप उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत कसबा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस वाढत गेली. त्यामुळे आता होणार्या महापालिका निवडणुकीत हा बालेकिल्ला कोणता पक्ष भेदणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ आणि शुक्रवार पेठांचा भाग या प्रभागात येतो. 2012 मध्ये दोन सदस्यांचा असलेल्या या प्रभागातून दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि आमदर हेमंत रासने निवडून आले होते, तसेच मनसेच्या ड. रूपाली पाटील आणि भाजपचे दिलीप काळोखे शुक्रवार आणि गुरुवार पेठ परिसरातून निवडून आले होते. पुढे 2017 मध्ये हे दोन्ही प्रभाग एकत्र करून चार सदस्यांचा प्रभाग करण्यात आला.
या निवडणुकीत मुक्ता टिळक, हेमंत रासने, राजेश येनपुरे आणि गायत्री खडके हे सर्व भाजपकडून विजयी ठरले. या प्रभागातच 2017 च्या निवडणुकीची सांगता सभा झाली होती. या सभेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सभेला अपेक्षित गर्दी नव्हती, त्यामुळे भाजपला फटका बसेल अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात मुक्ता टिळक 25 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आल्या. त्यामुळे हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते.
दोन जागा रिक्त; तिकिटासाठी चुरस
टिळक आणि रासने हे दोघेही निवडून आमदार झाल्याने या प्रभागातील दोन जागा रिक्त आहेत. नव्या आरक्षणानुसार या प्रभागातील दोन जागा ओबीसी महिला आणि खुली महिला अशा आरक्षित आहेत. त्यामुळे मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांच्या नावांची चर्चा आहे.
2017 मध्ये भाजपने उमेदवारांमध्ये मोठा बदल केला होता. यंदा नवीन चेहर्यांना संधी मिळणार, की अनुभवी उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार, याकडे इच्छुकांचे लक्ष आहे. या प्रभागात 2012 मध्ये मनसेला एक जागा मिळाली होती, तर त्यापूर्वी काँग्रेसचेही नगरसेवक या भागात निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून अनेक जण इच्छूक आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांकडूनही मोठ्या संख्येने इच्छुक मैदानात आहेत.
प्रचारात हे मुद्दे ठरतील महत्त्वाचे
* जुन्या वाड्यांचा पुनर्विकास
* व्यापारी भागातील वाहतूक कोंडी
* डीपीमधील रखडलेले पार्किंग विकास
* अरुंद रस्ते आणि गल्ली- बोळ
* सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा
* ग्रीन बेल्टमधील बांधकामबंदी
* ड्रेनेज लाइनची संपलेली क्षमता
इच्छुकांची स्थिती
भाजप : कुणाल टिळक, स्वरदा बापट, बापू मानकर, दिलीप काळोखे, सतीश मोहोळ, प्रमोद कोंढरे, प्रणव गंजीवाले, उदय लेले, हेमंत लेले, कल्याणी नाईक, रोहिणी नाईक, बापू नाईक, पप्पू कोठारी, नीलेश कदम.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस : ड. रूपाली पाटील, सुनील खाटपे, राहुल पायगुडे, अण्णा देशमुख, पुरुषोत्तम नांगरे, पूनम बनकर, सनी किर्वे.
महाविकास आघाडी : बाळासाहेब दाभेकर, दीपक पोकळे, अप्पा जाधव, रोहन पायगुडे, अजिंक्य पालकर, निरंजन दाभेकर, गौरव बोरटे, सुरेश कांबळे, अंजली सोलापूर, गोरख पळसकर, महेश हराळे, ऋषिकेश वीरकर.
मनसे : गणेश भोकरे, आशिष देवधर, नीलेश हांडे, ड. मोनिका खलाने, मकरंद मनकीकर.
शिवसेना
– रणजीत ढगे पाटील, नीलेश धुमाळ, प्रकाश ढमढेरे, गौरव साईनकर





