Pune Weather Update : पुण्यात किमान तापमानात ३ अंशांची वाढ; ‘या’ भागात सर्वाधिक उष्णता
Pune Weather Update : जिल्ह्यात आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता; हवामान विभागाकडून तापमानातील बदलाची माहिती.

Pune Weather Update – शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने घटत असलेल्या किमान तापमानात शुक्रवारी (दि. २७) दोन ते तीन अंशाने वाढ झाली. परिणामी पहाटेचा गारवा कमी झाला असून, आज दिवसभरात कमाल तापमानातही वाढ झाल्यामुळे दुपारचा उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. लोहगाव येथे सर्वाधिक ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
जिल्ह्यातील शिरूर, कुरवंडे यासह एनडीए आणि हवेली परिसरात गेल्या २४ तासांत किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली आल्यामुळे पहाटेचा गारवा वाढला होता. मागील आठवड्यात शहरासह जिल्ह्यात ऊन, ढगाळ वातावरण आणि गारवा असा हवामानाचा लपंडाव सुरू आहे.
बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होत असून, शुक्रवारी (दि. २७) सकाळपासून किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे दोन दिवसांपासून पहाटे जाणवणारी थंडी गायब झाली आहे. किमान तापमान ११ ते १२ अंशाच्या पुढे नोंदविले गेले. दुपारी कमाल तापमानातही वाढ झाल्याने दिवसभर उन्हाचा चटका जाणवत होता.
फेब्रुवारीतच उन्हाचा चटका वाढल्यामुळे यंदाचा उन्हाळा चांगलाच तापवणार असे दिसते. आज लोहगाव पाठोपाठ शिवाजीनर, कोरेगाव पार्क, हवेली परिसरातील कमाल तापमान ३२ ते ३३ अंशाच्या जवळपास होते. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील आकाश निरभ्र राहील, कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, त्यानंतर कमाल तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे.





