Pune Weather: हवेलीत पारा ६.६ अंशांवर! कडाक्याच्या थंडीने शहरासह उपनगरांना भरली हुडहुडी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरासह जिल्ह्यातील थंडीचा पारा दिवसेंदिवस घटत असून, रविवारी (दि. २१) किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट झाली. परिणामी जिल्ह्यात थंडीची लाट अधिक वाढली असून, हवेली परिसरात कडाक्याच्या थंडीने नागरिक गारठले आहेत. आज हवेली येथे सर्वांत कमी ६.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.सलग पाचव्या दिवशी शहरासह उपनगरांतील किमान तापमानात घट झाली.
विशेषत: डोंगर भाग आणि धरणक्षेत्र परिसरात थंडीची लाट अधिक तीव्र झाल्यामुळे एनडीए, पाषाण, खडकवासला, धायरी, आंबेगाव, जांभूळवाडी, कात्रज आदी परिसरात हुडहुडीने नागरिक गारठले आहेत, तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातही थंडीचा कडाका जाणवत असून, येथील किमान तापमान ६ ते ९ अंशांच्या आसपास आहे.
त्या तुलनेत कोरेगाव पार्क, येरवडा, विश्रांतवाडी आणि हडपसर परिसरात थंडीचा जोर काहीसा कमी आहे.या परिसरात किमान तापमान १२ ते १६ अंशांच्या आसपास नोंदविले गेले आहे. आज पहाटे धुके आणि थंडीचा कडाका अधिक जाणवत होता, तर सकाळी अकरा वाजेपर्यंत हवेत गारवा असल्यामुळे थंडी जाणवत होती.
सायंकाळी पाच वाजल्यापासूनच थंडीला सुरुवात होत असल्याने संध्यकाळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, तर किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरासह जिल्ह्यातील आजचे किमान तापमान…
हवेली ६.६, पाषाण ८.३, शिवाजीनगर ८.४, बारामती ८.५, दौंड ८.६, माळीण १०, तळेगाव दाभाडे १०.७, आंबेगाव ११.९, शिरूर १२.५, कोरेगाव पार्क १२.९, चिंचवड १५.१, मगरपट्टा १५.५, वडगावशेरी १५.६, हडपसर १६.४ अंश सेल्सिअस.





