प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यात रविवार दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. चिंचवड, शिवाजीनगरमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडल्यामुळे रस्त्यावर पाण्याचे पाट वाहू लागले. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. चिंचवडमध्ये १५ तर शिवाजीनगरला १० मिमी पाऊस झाला. सलग चार दिवस पडत असलेल्या पावसाने किमान तापमानात तीन-चार अंशाने घट झाली आहे.मागील चार दिवसांपासून दररोज सायकाळनंतर पाऊस हजेरी लावत पुणेकरांची धांदल उडवत आहे. शहरात सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. दुपारी आकाशात काळे ढग भरून आले आणि काहीवेळातच पावसाला सुरवात झाली. पंधरा मिनिटे ते अर्धा तास झालेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडवली. चिंचवड परिसरात सर्वाधिक १५ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे १० तर एनडीए परिसरात ५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यासह घाटमाथ्यावरही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. ३३ ते ३४ अंशावर गेलेला पारा मागील ४८ तासात २९ ते ३० अंशापर्यंत खाली आला आहे. परिणामी दुपारी उकाडा तर रात्री हवेत गारवा जाणवत आहे. दरम्यान, पुढील २४ तासात पुणे शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यता ढगाळ राहील तर दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.