प्रभात वृत्तसेवा पुणे – मागील ४८ तासांत किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील थंडीची लाट ओसरत आहे. परिणामी हुडहुडी भरलेल्या पुणेकरांना दिलासा मिळत असून, रविवारी (दि. २८) पाषाण आणि बारामती परिसरात सर्वात कमी ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.मागील महिन्याभरापासून शहरासह जिल्ह्यात थंडीचा मुक्काम असून, हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंदही याच महिन्यात झाली. महिनाअखेरीस किमान तापमानात काही अंशी वाढ झाल्यामुळे थंडीची लाट ओसरली असली, तरी सकाळी आणि रात्री चांगलाच जोर जाणवत आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. गेल्या २४ तासांत शहरातील किमान तापमान ९ ते १० अंशाच्या पुढे नोंदविले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाषाण, बारामती, लोणी काळभोर आणि माळीण परिसरात एक आकडी थंडीचा पारा होता. शिवाजीनगर येथे आज किमान तापमान १० अंशाच्या पुढे नोंदविले. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात थंडीचा कडाका कमी झाला, तर उपनगरातील पाषाण, औंध, एनडीए, वारजे, खडकवासला, कात्रज, जांभूळवाडी, धायरी, नांदेड फाटा या परिसरात थंडीचा जोर कायम आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, त्यानंतर किमान तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढू शकतो, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख भागातील किमान तापमान पाषाण आणि बारामती ९.५, लोणीकाळभोर ९.६, माळीण ९.७, शिवाजीनगर आणि तळेगाव दाभाडे १०.१, दौंड १०.६, कुरवंडे ११.८, हडपसर १२.३, गिरीवन १३.९, कोरेगाव पार्क १४.१, वडगावशेरी १५.५, मगरपट्टा १५.९ अंश सेल्सिअस.