Pune Weather : पुणेकरांची अंगाची लाहीलाही! लोहगावचा पारा ४२ अंशांच्या पार; पावसानेही फिरवली पाठ
Pune Weather : पुण्यात रविवारी कमाल तापमानात दीड अंशाने वाढ; लोहगाव, शिवाजीनगर आणि कोरेगाव पार्क परिसरात उष्णतेचा प्रचंड चटका.

Pune Weather – शहरात रविवारी कमाल तापमानात एक ते दीड अंशाने वाढ झाल्याने उष्णतेचा पारा पुन्हा ४२ अंशाच्या पुढे गेला. परिणामी दुपारी लोहगावसह शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, मगरपट्टा, वडगावशेरी परिसरात उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता. रविवारी (दि. १०) लोहगाव येथे सर्वाधिक ४२.७ तर शिवाजीनगर येथे ४१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, दुपारनंतर आकाशात काळे ढग भरून आल्याने पावसाची शक्यता वाटत होती. मात्र, त्याने हुलकावणी दिली. मागील दोन ते तीन दिवसांपासून ऊन-ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू आहे. रविवारी (दि. ९) सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचा चटका चांगलाच वाढला. लोहगावबरोबरच शिवाजीनगर परिसरात उष्णतेचा पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आणि अंगाची लाहीलाही होवू लागली. दुपारी चारनंतर उपनगरासह शहरात काळे ढग भरून आले.
वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वाटत होती. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. परिणामी जिल्ह्यातील काही परिसरातील कमाल व किमान तापमानात घट झाली. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र, दुपारनंतर ढगाळ वातावरण कायम राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
रविवारचे तापमान
लोहगाव ४२.७, शिवाजीनगर ४१.४, कोरेगाव पार्क-वडगावशेरी ४०.९, तळेगाव दाभाडे ४०.६, चिंचवड ३९.९, बारामती ३९.८, मगरपट्टा ३९.७, राजगुरूनगर ३९.५, पाषाण ३९.४, दौंड-हवेली ३८.८, हडपसर ३८.२, माळीण ३८ अंश सेल्सिअस





