Pune Weather – शहरातील उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत कमाल तापमानात एक ते दीड अंशाने वाढ झाल्यामुळे शनिवारी (दि. ७) शहरातील लोहगाव परिसरातील उष्णतेचा पारा ३९ अंशापर्यंत पोहचला. कोरेगाव पार्क, शिवाजीनगर आणि चिंचवड परिसरातही उष्णतेचा वाढता चटका अंगाची लाहिलाही करू लागला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरासह जिल्ह्यातील उन्हाचा चटका असह्य करत असून, दुपारी १२ ते ३ दरम्यान डोक्यावर आलेले ऊन तापत आहे. दिवसभरात शहराच्या मध्यवर्ती भागासह कोरेगाव पार्क, पाषाण, मगरपट्टा, हडपसर यासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये उष्णतेच्या झळा अंगाची लाहिलाही करत आहे. विदर्भापाठोपाठ पुणे शहरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. आज, विदर्भात उष्णतेचा पारा ४१ अंशावर असून, पुणे शहरात पारा ३९ अंशापर्यंत पोहचला आहे. लोहगाव आणि कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच, लवळे येथे ३७.१, चिंचवड परिसरात ३६.८, शिवाजीनगर येथे ३६.६ तर मगरपट्टा परिसरात ३५.९ कमाल तापमानाची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी वाढत्या कमाल तापमानामुळे पुणेकर घामाघूम झाले. उन्हाच्या चटक्याने चक्कर येणे, डोकेदुखी, पोटदुखी, आशक्तपणा आदी त्रास होत असून वाढता उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारी १२ ते ४ दरम्यान, घराबाहेर पडणे टाळावे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांनी डोक्यावर टोपी, नाका-तोंडाला रूमाल आणि अंग झाकेल, अशी कपडे घालावी. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस हवामान कोरडे राहील. तर कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली असून, उन्हाचा चटका आणखीन लाहीलाही करणार आहे.