Pune Weather: पुणेकरांची लाहीलाही! निम्मा जून संपला तरी मान्सून गायब; ६ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद
Pune Weather: निम्मा जून महिना संपत आला तरी पुण्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम; तीव्र उन्हाच्या चटक्याने आणि असह्य उकाड्याने पुणेकर हैराण.

Pune Weather – निम्मा जून महिना संपला तरी पुण्यात मान्सूनची चाहूलही लागलेली नाही. शहराच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून, तीव्र उन्हाचा चटका आणि असह्य उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, तो गेल्या सहा वर्षांतील जून महिन्यातील उच्चांक ठरला आहे.
यापूर्वी २०१९ मध्ये जूनचे कमाल तापमान ३९.६ तर २०१४ मध्ये सर्वाधिक ४०.३ अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले होते. गतवर्षी २०२५ मधील जूनच्या पहिल्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या सरींनी धुमाकूळ घातला होता. पहिल्या १५ दिवसांतच शहरात १०० ते १२५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. संपूर्ण जूनमध्ये तब्बल २६७ मिमी पावसाची नोंद झाली होती.
मात्र, यंदा मागील दोन आठवड्यात पावसाचा साधा शिडकावाही झालेला नाही. पाऊस लांबल्यामुळे यंदा जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमाल तापमान ३८.५ अंशांवर पोहोचले होते. त्यानंतर पुढील आठवडाभर हे तापमान ३८ अंशाच्या घरातच स्थिरावले होते. सध्या कमाल तापमानात किंचित घट झाली असली, तरी हवेतील दमटपणामुळे उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे.
मागील चार वर्षात या पंधरवड्यातील सर्वाधिक कमाल तापमान ३३ ते ३७ अंशाच्या आसपास होते. २०२३ मध्ये चक्रीवादळामुळे मान्सून लांबला होता, त्यामुळे पहिल्या पंधरवड्यात कमाल तापमान ३७.७ अंशावर पोहचले. २०१९ मध्ये मान्सून लांबल्यामुळे कमाल तापमान ४० अंशापर्यंत पोहचले होते. यंदाही अशीच परिस्थिती दिसून येते.





