Monsoon Alert : महाराष्ट्रात मान्सूनची सध्याची परिस्थिती काय ? कोणत्या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा ते जाणून घ्या…
Monsoon Alert : राज्यात मान्सूनचा प्रवास सलग सहाव्या दिवशीही ठप्प राहिल्याने अनेक भागांतील पावसाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून, काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.

Monsoon Alert : राज्यात मान्सूनचा प्रवास सलग सहाव्या दिवशीही ठप्प राहिल्याने अनेक भागांतील पावसाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून, काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या मान्सूनची सीमा रत्नागिरी, सातारा आणि सोलापूरपर्यंतच कायम असून, महाराष्ट्रात त्याची पुढील प्रगती झालेली नाही. देशातही शनिवारी मान्सूनने विशेष आगेकूच केली नसून, त्याची सीमा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, भद्राद्री कोठागुडम, कलिंगापटनम, पारादीप, बारिपाडा, पुरुलिया, धनबाद आणि मुझफ्फरपूर या भागांपर्यंत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ओडिशा आणि छत्तीसगडमधील आणखी काही भागही मान्सूनच्या प्रगतीस अनुकूल ठरणार आहेत.
विदर्भात ऑरेंज अलर्ट – (Monsoon Alert)
विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील काही भागांत उष्णतेची लाट, तर काही भागांत वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता – (Monsoon Alert)
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज असून, अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवार ते बुधवार या कालावधीत मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात तीन दिवस ढगाळ वातावरण –
मराठवाड्यात रविवारी काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून, सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत सर्व जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भातील बुलडाणा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत रविवारी व सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, त्यानंतर पावसाची शक्यता आहे. इतर विदर्भात पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता कायम आहे.
कोकणात उष्ण-दमट वातावरण, मुंबईतही वादळी पावसाची शक्यता –कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, त्यानंतर वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत सोमवारपासून सलग तीन दिवस उष्ण-दमट वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे.
Monsoon Alert : महाराष्ट्रात मान्सूनची सध्याची परिस्थिती काय ? कोणत्या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा ते जाणून घ्या…
रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस उष्ण-दमट वातावरणासह वादळी पावसाची शक्यता असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे वेधशाळेचा इशारा : ‘एल निनो’चा मान्सूनवर प्रभाव; महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असून महाराष्ट्रासह देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीच्या सुमारे ९० टक्के इतकाच पाऊस होण्याचा अंदाज आहे.
सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक वातावरणीय परिस्थिती अनुकूल नसल्याने त्याचा वेग मंदावला असून, राज्यात व्यापक स्वरूपाच्या पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
घाईघाईने पेरणी करू नये –
पूर्वमोसमी पावसाच्या आधारे घाईघाईने पेरणी करू नये, असा महत्त्वाचा सल्लाही हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पावसात खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पेरणीचे निर्णय काळजीपूर्वक घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मान्सूनच्या बदलत्या स्थितीचा विचार करून कृषी नियोजन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास त्याचा परिणाम शेती, जलसाठे आणि पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. पावसावर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याबरोबरच धरणांतील जलसाठ्यावरही परिणाम होऊ शकतो. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एल निनो आणि दुष्काळाचा संबंध –
एल निनो आणि दुष्काळ यांचा थेट संबंध असल्याचे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी भूतकाळातील अनेक दुष्काळी परिस्थितींमध्ये त्याचा प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळे यंदाच्या संभाव्य परिणामांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पूर्वानुभव काय सांगतो?
सन २००२, २००९ आणि २०१५ या एल निनो वर्षांमध्ये मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याची नोंद आहे. अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता आणि काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, प्रत्येक एल निनो वर्ष दुष्काळीच ठरते, असे नाही, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
मान्सूनच्या वाटचालीकडे लक्ष –
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या वितरणात असमतोल निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही भागांत मान्सूनचे आगमन उशिरा होऊ शकते, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
याउलट काही भागांना अल्प कालावधीत अतिवृष्टीचाही सामना करावा लागू शकतो. परिणामी, कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता असून आगामी काही दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.





