Pune Weather : पुण्यात थंडीचा जोर कायम; किमान तापमान ११ अंशांवर,धुक्याने शहर झाकले

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात गेल्या २४ तासात फारसा बदल झाला नसला तरी थंडीचा जोर कायम आहे. विशेषत: जिल्ह्यातील काही भागात किमान तापमान ११ अंशापर्यंत खाली आले तर शहरातील उपनगर परिसरातील थंडीचा पारा ११ ते १२ अंशापर्यंत खाली आल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागातील किमान तापमान स्थिर असून सकाळ-संध्याकाळी बोचरी थंडी जाणवत आहे.
मागील आठवाड्यात झपाट्याने खाली आलेल्या किमान तापमान मागील दोन दिवसांपासून जैसे थे आहे. जिल्ह्यातील काही भाग वगळता शहरात किमान तापमान ११ ते १३ अंशाच्या आसपास राहिले आहे. उपनगरातील काही भागात पहाटे धुक्यांची चादर पसरलेल्याचे दिसून येते. त्यामुळे सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे.
दिवसभर ऊन पडत असून, मागील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानातही घट झाल्यामुळे संध्याकाळी पुन्हा थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीचा जोर आहे तसा राहील.



