प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यातील थंडीचा पारा एक ते दोन अंशाने घटला आहे. हवेली आणि माळीण परिसरात तर एक अंकी किमान तापमान नोंदविल्यामुळे हुडहुडी भरणाऱ्या थंडीला सुरुवात झाली असून, शिवाजीनगर, पाषाण परिसरातीलही किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. हवेली परिसरात गेल्या २४ तासांत किमान तापमानात दोन अंशाने घट झाली असून, यंदाच्या हंगामातील सर्वात कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर माळीण परिसरातील किमान तापमानही ९.९ अंशापर्यंत खाली आले. शिवाजीनगर, पाषाण यांसह अन्य काही परिसरात ११ ते १२ अंशावर असलेले किमान तापमान आज १० अंशापर्यंत खाली आले. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील कोथरूड, पाषाण, धायरी, खडकवासला, वारजे, सिंहगड रोड, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, उंड्री, विश्रांतवाडी, हडपसर, खराडी, औंध या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा अनुभव पुणेकर घेत आहेत. रविवारी (दि. १६) पाषाण, हवेली, एनडीए परिसरात पहाटे मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते. त्यामुळे सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत थंडी जाणवत होती. तर रात्रीही हुडहुडी भरणाऱ्या थंडीमुळे पुणेकर चांगलेच गारठले असून, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. किमान तापमानात किंचित घट होईल तर कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले. गारठा वाढल्याने स्वेटर, कानटोपी खरेदीला गर्दी मागील आठ दिवसांपासून शहरातील किमान तापमानात सातत्याने घट होत असून, हुडहुडी भरणाऱ्या बोचऱ्या थंडीमुळे पुणेकरांनी स्वेटर, कानटोप्या खरेदीसाठी गर्दी करू लागले आहे. तसेच, रात्री थंडीचा बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शहरासह जिल्ह्यातील आजचे किमान तापमान हवेली ८.६, माळीण ९.९, पाषाण १०.१, तळेगाव दाभाडे आणि बारामती १०.५, शिवाजीनगर १०.६, दौंड ११.१, आंबेगाव ११.७, भोर १३.७, कोरेगाव पार्क १४.७, चिंचवड १५.३, वडगावशेरी १६.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.