पुणे : कळस परिसरातील सर्व समस्या सोडवू : बापूसाहेब पठारे

पदयात्रेला कळसच्या मतदारांचा उस्त्फुर्त प्रतिसाद
विश्रांतवाडी : कळस गावातील कचरा वर्गीकरणामुळे लोकवस्तीला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अमेनिटी स्पेस चा वापर प्रभावीपणे व्हावा,अशी मागणी आहे.भाजी मंडईपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.ते सोडविण्याचे काम केले जाणार आहे. परिसरातील स्मशानभूमीत सुरक्षितता नाही.तेथे अनेक गैरप्रकार चालतात, ते बंद केले जातील. पालिकेच्या हॉस्पिटल मध्ये सुविधा वाढविल्या जातील. येणाऱ्या काळात या सर्व मुद्यांना न्याय देत कळस परिसरातील भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन बापूसाहेब पठारे यांनी दिले.
वडगावशेरी मतदारसंघातील महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी शनिवारी (दि.९) पदयात्रा काढून कळस परिसरातील राजकीय वातावरण ढवळून काढले. पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश (अप्पा) म्हस्के यांच्यासह शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, आम आदमी पार्टि व रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया (सचिन खरात गट) या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आपल्या प्रचारात जोरदार गती घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेपाठोपाठ लोहगाव येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
कळस भागात प्रकाश अप्पा म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क करण्यात आला.
‘घरोघरी संपर्क असलेले उमेदवार म्हणून उच्चांकी मतदानाने बापूसाहेब पठारे निवडून येतील आणि वडगावशेरीत नवा राजकीय इतिहास घडविला जाईल’,असे प्रतिपादन प्रकाश म्हस्के यांनी केले.





